नाशिक, दिनांक 27 (जिमाका वृत्तसेवा) – शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी आढावा घेण्यात आला, त्यावेळी डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील, नाशिक महानगरपालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. त्र्यंबके आदी उपस्थित होते.
गर्भवती मातांना त्यांच्या प्रसूती कालावधीपर्यंत सर्व आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात. तसेच डेंग्यू, चिकनगुन्या या कीटकजन्य आजारांच्या निदानासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्त नमुन्याची तपासणी करण्यात यावी. जेणेकरून त्यांना त्यांच्या परिसरात सर्व आरोग्य सेवा मिळतील यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील व महानगरपालिका क्षेत्रातील कीटकजन्य आजारी रुग्णांची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियंत्रणात असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी समाधान व्यक्त केले.