नाशिक, दिनांक: 01 सप्टेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा): बांबूची शेती बहुउपयोगी असून ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनसोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, तहसीलदार अनिल दौंडे, कार्यक्रमाचे संयोजक आत्माराम दाते, दाते बांबू नर्सरीचे संचालक प्रशांत दाते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, कोरडवाहू नापीक जमिनीवर बांबूचे पीक घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेती करण्यासाठी पुढे यावे. दिवसेंदिवस बांबू चे महत्व वाढत आहे. आज बऱ्याच ठिकाणी प्लास्टीक ग्लास ऐवजी बांबूचा ग्लासचा उपयोग करण्यात येत आहे. पदार्थ बांबूच्या पानापासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. बांबूचे अनेक उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी बांबू शेती करुन त्यामध्ये नवनवीन प्रयोग राबवावे. नवनवीन प्रयोग राबवितांना शासन, सामाजिक संस्थांचा त्यामध्ये सहभाग घ्यावा, असेही यावेळी श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी 96 प्रकारच्या विविध बांबू प्रजाती असलेल्या नर्सरीची पाहणी व बांबू पासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी केली. दाते परिवाराने बांबू नर्सरीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांचे यावेळी श्री.कोश्यारी यांनी कौतुक करुन अभिनदंन केले.
बांबू क्लस्टरचा विकास करावा: नरहरी झिरवाळ
बांबूची शेती अतिशय उपयोगी व फायदेशीर आहे. आदिवासी भागात बांबू शेतीचा अधिक प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाच्या पारंपरिक मार्गदर्शक सूचना बदलणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात याव्यात,जेणेकरुन बांबू क्लस्टरचा विकास करण्यात येईल, असे मत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
000