अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई देणार
अमरावती, दि. 1 : शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष धोरण निर्माण करण्यात येईल. ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमातून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
कृषी विभागाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या राज्यस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ कृषिमंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत धारणी तालुक्यातील सादराबाडी येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री श्री. सत्तार यांचे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास साद्राबाडी येथे आगमन झाले. त्यांनी गावातील शैलेंद्र सावलकर या शेतकरी बांधवाच्या घरी मुक्काम केला. या शेतकरी कुटुंबासोबत जेवण केले.विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून शेतीबाबत विविध विषयांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे, आज सकाळी शैलेंद्र सावलकर, संजू धांडे, दत्तात्रय पटेल, सरपंच लक्ष्मीताई पटेल, तसेच इतर शेतकरी बांधवांशी चर्चा करून शेतीविषयक अडचणी व आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. गावातील प्रत्येक घराला भेट देऊन त्यांनी गावकरी बांधवांशी, महिला भगिनी, युवक, ज्येष्ठ शेतकऱ्यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत मिळवून देणार
मंत्री श्री सत्तार यांनी सादराबाडी शिवारातील अनेक शेतांना भेट देऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल तत्काळ भरपाई देण्यात येईल. आवश्यक सर्व प्रक्रिया प्रशासनाने गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री श्री सत्तार यांनी दिले.
बळीराजासोबत एक दिवस हा उपक्रम लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहभागाने राज्यभर १०० दिवस राबविण्यात येणार आहे. याद्वारे प्राप्त सूचना लक्षात घेऊन प्रभावी धोरण राबविण्यात येईल.
शेतकरी बांधवाना अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसानाची भरपाई वेळेत मिळवून द्यावी. शेतकरी बांधवांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शेतकरी बांधवांच्या अडचणी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक बाबी जाणून घेता याव्यात यासाठी मंत्री श्री सत्तार यांनी आपला संपूर्ण दिवस सावलकर, धांडे शेतकरी कुटुंबासोबत व्यतीत केला. त्यांच्या कुडामातीच्या घरात मुक्काम केला. आपुलकी व जिव्हाळ्याने त्यांच्याशी संवाद साधत शेतकरी दिनचर्या स्वतः अनुभवली. रानभाजी व भाकरीचे अप्रतिम जेवण व आपुलकीमय आतिथ्य येथे अनुभवले. रात्रीच्या पावसात कौलातून एका ठिकाणी पाऊस घरात येत होता व शेतकरी बांधवांनी तत्काळ हालचाली करून तिथे आच्छादन घातले. एकंदर शेतकरी बांधवांच्या दिनचर्यातील विविध बाबी जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. पहाटे दूध दोहण्यापासून ते शेतात जाणे, सायंकाळपर्यंतची सर्व कामे या उपक्रमानिमित्त अनुभवता आली. या दरम्यान त्यांच्याशी सतत शेतीविषयक अडचणी व त्यावरील उपाय योजना याबाबत संवाद सुरू होता. ज्या शेतकरी कुटुंबाकडे मुक्काम केला व आपुलकीचे आतिथ्य अनुभवले, त्या कुटुंबाला स्वखर्चाने घर बांधून देण्याचे मंत्री श्री सत्तार यांनी जाहीर केले. त्यानंतर आज दुपारीच मंत्री महोदयांच्या व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत नियोजित घराचे भूमिपूजनही करण्यात आले. शेतकरी कुटुंबाने यावेळी पहिल्यांदाच मेळघाटात मंत्री महोदयांचा मुक्काम व दिवसभर उपस्थितीचा कार्यक्रम झ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर गावाच्या सरपंच लक्ष्मीताई पटेल जिल्हाधिकारी पवनीत कौर मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, आमदार राजकुमार पटेल, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी जी डी देशमुख आदी उपस्थित होते.
०००