मुंबई, दि. 5 : देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, एल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईक, सीईओ एस.एम. सुब्रमण्यम, चेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईक, प्राचार्य मधुरा फडके, शिक्षक आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. शाह म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण बहुआयामी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार आहे. शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मानवतावादी, आध्यात्मवादी विचार देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा मनात रुजवावेत. एक उत्तम शिक्षक कसा असावा, यांचा बोध घ्यायला हवा. शिक्षकांनी बालकांना समाजातील उत्तम नागरिक बनवावे. पंचतंत्र सारख्या बोधकथांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत, असेही आवाहन श्री. शाह यांनी केले.
भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एल अँड टी ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा या राष्ट्रनिर्माण कार्यात ए. एम. नाईक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले आहे. आता श्री. नाईक यांनी पायाभूत सुविधांसोबतच व्यक्तिनिर्माण करुन राष्ट्रनिर्माण करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर त्यांचे चांगले चारित्र्य निर्माण होणार आहे. या धोरणामुळे समाजातील सर्व वर्गातील व्यक्तींना समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी हे हिऱ्यासारखे मौल्यवान असून त्यांना पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक करतात, असे सांगून शिक्षक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
000