Home ताज्या बातम्या राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

0
राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

पुणे दि.७: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असे साकडे त्यांनी श्री गणरायाला घातले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. त्वष्टा कासार समाज संस्था गणेश मंडळ, बुधवार पेठ येथील अशोक मंडळ ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशी बाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालीम मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील छत्रपती राजाराम मंडळ, नवी पेठ येथील यशवंत नगर गणेशोत्सव मंडळ, कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले. यावेळी त्यांचा मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

केसरीवाडा येथे गणेश दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेतली. त्यावेळी श्रीमती टिळक यांनी गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. तसेच त्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री. पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

निर्बंधमुक्त गणेशोत्सव; भाविकांच्या उत्साहाला उधाण

कोरोनाच्या साथीमुळे २०२० पासून दोन वर्षे निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शासनाने निर्बंध दूर केल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सर्व गणेश मंडळांनी कल्पकतेने देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे, असेही श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेत असताना नागरिकही श्री. शिंदे यांना भेटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा  उभे होते. मुख्यमंत्र्यांनीही गाडीतून बाहेर येत त्यांची भेट घेतली.