मुंबई, दि. 8 : इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना 10 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेले, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणिय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
000