Home बातम्या ऐतिहासिक राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

0
राज्यात आजपासून कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

मुंबई दि. 12 : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज दिल्या. कुष्ठ आणि क्षय रोगांचे लवकर निदान होऊन लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रोग आणि क्षय रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या.

आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकर, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, अलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट अँथोनी, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पै, महाराष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीत, कुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.

कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियानाबाबत

राज्यात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियान सुरू करण्यात येणार आहे.

याअंतर्गत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

राज्यातील सुमारे पावणे दोन कोटी घरांना भेटी पथकाद्वारे दिल्या जाणार आहेत.

यासाठी सुमारे 65 हजार पथके तयार करण्यात आली आहेत. येत्या चौदा दिवसात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल.

ग्रामीण भागातील 20 तर शहरी भागातील 25 घरांना दररोज भेटी दिल्या जातील.

लवकर निदान व लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.

०००००