मुंबई, दि. 13 : गृहनिर्माण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे. त्यामुळे आरोग्य, गृहनिर्माण आणि वातावरणातील बदल यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.
डॉ. सावंत यांच्या हस्ते नागरी स्वास्थ्य, गृहनिर्माण आणि वातावरणीय बदल या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बांद्रा कुर्ला संकुल येथील हॉटेल सोफिटेल येथे झालेल्या या कार्यशाळेत आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर फॉर यू आणि युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टर फॉर यू स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत जैन, संस्थापक डॉ. रविकांत सिंग, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाषचंद गुप्ता, युनिसेफच्या देविका देशमुख, हिमांशू जैन आदी उपस्थित होते.
मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्यविषयक विविध समस्या आहेत. झोपडपट्टींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी सुधारित घरे बांधली जात आहेत. यासाठी मुंबई महापालिका, मुंबई महानगर क्षेत्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मुंबईतील विविध आव्हानांना सामोरे जात आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आरोग्याच्या क्षेत्राशी निगडीत आव्हानांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी होवू शकेल का याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंब्रिज विद्यापीठाच्या प्रा. रोनिता बर्धन, मोहम्मद खोराकीवाला, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.