मुंबई, दि.२४: लम्पी आजार केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार आढळून आलेला नाही. हा आजार प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने लम्पी आजार होण्याची भीती नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले.
मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. सर्व जनावरांवर उपचार करण्यात आले असून ती जनावरे आता रोगमुक्त झाली आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील सर्व गोवर्गीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोशाळा व गोठ्यांमधील गोवर्गीय जनावरांचे लसीकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पूर्ण केलेले आहे.
मागील पशुगणनेनुसार मुंबई शहरात एकूण 3226 गोवर्गीय जनावरे असून 3206 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. याउपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 1916, 022 2556 3284, 02225563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. पेठे यांनी केले आहे.