Home शहरे अकोला पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

0
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपाडे यांनी केले.

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले की, राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf  या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत पदवीधर मतदार संघाकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं किंवा रहिवाशी कल्याणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली.

000

संजय ओरके/विसंअ/26.9.22