नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री अजय भट, केंद्रीय पर्यटन सचिव अरविंद सिंह, अतिरीक्त सचिव राकेश वर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राला सर्वोकृष्ट राज्यासाठीचा सर्वकष पर्यटन विकासाचा व्दितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर यांनी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.
पर्यटन क्षेत्रातील विविध सेवा सुविधा पुरविणा-या शासकीय संस्थांसोबतच खाजगी सेवा पुरविणा-या संस्थांनाही राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये ही महाराष्ट्राने मोहर उमटविली आहे.
पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर परिषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला.
मुंबईतील ताजमहाल पॅलेस या पंचतारांकीत डिलक्स हॉटेलला ‘पंचतारांकीत हॉटेल’ श्रेणीतील चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पश्चिम विभागातील उत्कृष्ट निरोगता (वेलनेस) केंद्र या श्रेणीतील पुरस्कार पुण्यातील आत्मंतन वेलनेस, मुळशी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या श्रेणीतील पुरस्कार चंदन भडसावळे यांना सगुनाबाग (नेरळ) येथे सुरू केलेल्या ग्रामीण पर्यटन केंद्राला प्रदान करण्यात आला.
द वेस्टर्न रूट्स या ट्रॅव्हल कंपनीला जबाबदार पर्यटन प्रकल्पातंर्गत उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार श्री. परांजपे यांनी स्वीकारला.
पर्यटक वाहतूक परीचालक श्रेणी -2 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबईतील गीती ट्रॅव्हल्स यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मनमाहेन गोयल यांनी स्वीकारला.
पर्यटक परिवहन संचालक श्रेणी-1 मधील व्दितीय क्रमांचा पुरस्कार ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस मर्यादित ला प्रदान करण्यात आला.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाव्दारे परवाना प्राप्त अतुल्य भारत बेड एंड ब्रेकफास्ट (गोल्डन आणि सिल्वर) या श्रेणीतंर्गत पाचगणी येथील डाला रूस्टर, होमस्टे ला उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कॅप्टन विकास गोखले आणि श्रीमती गोखले यांनी स्वीकारला.
सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सहसंचालक, डॉ. धनंजय सावळकर म्हणाले, या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्यास प्रेरणा व उर्जा मिळणार. वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, वाहतूकीचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारीत पर्यटन विकासाचे मॉडेल आगामी काळात महाराष्ट्रात उभारले जाईल, अशी प्रतिक्रीया श्री सावळकर यांनी दिली.