मुंबई दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कोविड-१९ कालावधीनंतर पहिल्यांदाच या पुरस्काराचे वितरण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.
सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात येणार आहे.
२८ सप्टेंबर रोजीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मुंबई शहर पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांची उपस्थिती यावेळी असणार आहे.
उषा मंगेशकर यांनी मागील सात ते आठ दशके आपल्या गायनाने भारतीय संगीत क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. मराठी सोबतच हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, तमिळ, कन्नड, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. लावणी, लोकगीत, भक्तीगीत अशा सर्वच प्रकारच्या गाण्यांना न्याय दिला.
बासरी या वाद्याला अखिल विश्वात मानाचे स्थान मिळवून देण्याचे महान कार्य पं. हरीप्रसाद चौरसिया यांनी केले आहे. रागदारी संगीताबरोबच चित्रपट संगीत, भक्तीसंगीत, भावगीत याचबरोबर संगीत क्षेत्रात पंडीतजींची अतुलनीय कामगिरी आहे. ‘जहाँ आरा‘ चित्रपटापासून ‘सिलसिला‘ पर्यंत गीतांना पं. हरिप्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वर –लता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक हरिहरन, ज्येष्ठ सितार वादक निलाद्री कुमार व गायक अभिनेत्री आर्या आंबेकर आणि इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
‘स्वर-लता’ हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमाचा सर्व रसिक श्रोत्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत करण्यात आले आहे.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/27.9.22