Home ताज्या बातम्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार

0
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार

मुंबई, दि. 29 : भारतीय लोकप्रशासन संस्थेच्यावतीने देण्यात येणारा लोकप्रशासन 2021-2022 मधील नवोपक्रमासाठीचा ‘स्व.डॉ. एस एस. गडकरी स्मृती’ पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना आज येथे जाहीर करण्यात आला.

मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामध्ये हा पुरस्कार घोषित करण्यात आला. संस्थेचे मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे सचिव डॉ. विजय सतबीर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

श्री. क्षत्रिय म्हणाले, राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संस्थेचे बरेच उपक्रम राबविणे शक्य झाले नाही. ते उपक्रम आता आपण मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत. कोरोनाच्या काळात काही उपक्रम आपण दूरदृष्यप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपस्थित सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.

शाखेच्या आगामी उपक्रमाविषयी बोलताना श्री. क्षत्रिय म्हणाले, बी.जी. देशमुख निबंध स्पर्धा 2022-2023 साठी ‘नेतृत्व आणि समाजात महिलांची विकसित भूमिका’, ‘शहरातील प्रशासनातील बदल आणि आव्हाने’ हे दोन विषय असून अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याचबरोबर डॉ. एस. एस. गडकरी यांच्या नामांकनासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/29.9.22