Home शहरे अकोला नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे  – महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे  – महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

0
नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे  – महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

अमरावती दि. 1 (विमाका): लंपी प्रतिबंधक लसीकरण राज्‍यात व्यापक प्रमाणात सुरू असून पशुधनाच्या मृत्युत घट होत आहे. विभागात लसीकरणाचा वेग वाढवून कार्यवाही पूर्ण करावी. त्याचप्रमाणे, नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची विभागस्तरीय आढावा बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विभागातील सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की,  लंपी आजारामुळे अमरावती विभागात मृत पशुधनाची संख्या ६५५ आहे. अमरावती जिल्ह्यात १६३ जनावरे दगावली. लंपी आजाराच्या प्रादुर्भावाने गाय मृत झाल्यास ३० हजार, बैल मृत झाल्यास २५ हजार व वासरू दगावल्यास १६ हजार रूपये अर्थसाह्य, त्याचप्रमाणे जि. प. सेस फंडातून १० हजार रु. देण्याची तरतूद शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्तावाची कार्यवाही गतीने करून पुढील आठ दिवसांत विभागातील नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ ही मदत मिळवून द्यावी. राज्यात ७० लाखांवर पशुधनाचे लसीकरण झाले आहे. अमरावती विभागात सरासरी ८३ टक्के लसीकरण झाले आहे. ते पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.  

 ते पुढे म्हणाले की, अतिवृष्टीबाधितांना आवश्यक अर्थसाह्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि, अनेक ठिकाणी घरांची पडझड, जनावरांचे नुकसान आदींबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक प्रस्ताव व कार्यवाही पूर्ण करावी. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांत सातत्य ठेवावे. नागरिकांना जातीचे दाखले, क्रिमीलेअर व इतर प्रमाणपत्रे वेळेत मिळवून द्यावीत. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शिबिरे घ्यावीत.

वाळूबाबत अवैध प्रकारांमुळे सामाजिक पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत. याबाबत नव्याने स्वतंत्र धोरण अंमलात आणण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर मंत्री श्री. विखे पाटील यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

  

                                                       ०००००००