अमरावती दि. 1 (विमाका): : पोल्ट्री व्यवसाय हा स्वयंरोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा व्यवसाय आहे. याद्वारे अधिकाधिक रोजगार निर्मिती व विकास साधण्यासाठी कुक्कुटपालक बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
अंजनगाव बारीनजिक आयोजित कुक्कुटपालक मेळावा, तसेच आधुनिक कुक्कुटपालन केंद्राचा (विदर्भातील सर्वात मोठे स्वयंचलित लेअर फार्म) शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, रवींद्र मेटकर,दिलीप मेटकर आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतीसाठी उत्तम पूरक व्यवसाय, तसेच अधिक रोजगारनिर्मितीची शक्यता पोल्ट्री व्यवसायात आहे. कुक्कुटपालक बांधव व संस्थांनी देशातील बाजारपेठेचा अभ्यास करून विपणनासाठी संघटितपणे प्रयत्न करावेत. शासनाकडूनही सर्वतोपरी मदत केली जाईल.
छोट्या प्रमाणावर सुरुवात करून व्यवसायात मोठी भरारी घेणाऱ्या मेटकर कुटूंबियांचे त्यांनी कौतुक केले.
खासदार डॉ. बोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक कुक्कुटपालक, शेतकरी बांधव उपस्थित होते.