Home शहरे अकोला सर्वोत्तम १० चित्ररथांच्या प्रतिकृती मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ठेवाव्यात – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सर्वोत्तम १० चित्ररथांच्या प्रतिकृती मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ठेवाव्यात – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
सर्वोत्तम १० चित्ररथांच्या प्रतिकृती मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ठेवाव्यात – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ७ : नवी दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या परेडमधील महाराष्ट्राच्या पुरस्कारप्राप्त सर्वोत्तम १० चित्ररथांच्या प्रतिकृती मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंणात ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कोअर समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरासह महाराष्ट्रातही साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये सांस्कृतिक सभागृह आणि जिल्ह्यांमध्ये जिल्हा कला अकादमी निर्मितीबाबत तयारी करण्यात यावी. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात धोरण, कोअर आणि अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या तिन्ही समित्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. गेल्या वर्षी 12 मार्च 2021 पासून अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांना प्रारंभ झाला असून हे कार्यक्रम 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहेत. या दरम्यान भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, भारताने आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेली प्रगती, नवसंकल्पना यावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर असावा.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गृह विभागाची मदत घेऊन काही दिवसांपूर्वी राज्यभरातील कारागृहांमध्ये कैद्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याच धर्तीवर वृध्दाश्रमांमध्ये देखील विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी. गेल्या काही महिन्यांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात झालेल्या विविध कार्यक्रमांची नोंद केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/