Home ताज्या बातम्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट

लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट

0
लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची फलटणला भेट

सातारा दि. 9 : पशुसंवर्धन आयुक्त  सचिन्द्र प्रताप सिंह यांनी लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढाव्याकरिता फलटण तालुक्यातील बाधित गावांना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी तरडगाव, धुळदेव, फलटण व खामगाव परिसरातील लम्पी रोगाने बाधित झालेल्या जनावरांच्या औषधोपचाराचा आढावा घेतला.

आजपर्यंत तालुक्यात एकूण 28 गावात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून एकूण 1434 जनावरे या रोगाने बाधित झाले आहेत. लम्पी चर्म रोगाच्या उपचाराकरिता आवश्यक असणारी सर्व औषधे सर्व शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून तज्ञ पशुवैद्यकामार्फत बाधित जनावरांवर उपचार करण्यात येत असल्याचे श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.

योग्य उपचारानंतर लम्पी रोग बरा होत असल्याचे आजपर्यंत फलटण तालुक्यातील एकूण 548 जनावरे उपचारानंतर बरी झाल्याचे त्यांनी सांगितले. लम्पी रोग नियंत्रणाकरिता फलटण तालुक्यासाठी बाहेरच्या तालुक्यातून 3, इतर संस्थांकडून 3 व पुणे मुख्यालयातील 2 अधिकारी यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एकूण 20 पशुधन पर्यवेक्षक व 11 पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी बाधित जनावरावर उपचार करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सर्व बाधित जनावरांवर उपचाराकरिता तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ येथील तज्ञांचीही लम्पी रोग प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता नेमणूक करण्यात आली असून फलटण तालुक्यात असणाऱ्या सर्व 100% गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असल्याचे यावेळी श्री. सिंह यांनी सांगितले.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दक्ष राहून उपचार करण्याच्या सूचना यावेळी श्री. सिंह यांनी  दिल्या.

याप्रसंगी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. पंचपोर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. व्ही.टी. पवार तसेच डॉ. फाळके, डॉ. हगवणे, डॉ. भुजबळ, डॉ. मोरकाने, डॉ. पूनम भोसले व डॉ. प्राजक्ता भुजबळ आदी उपस्थित होते.