मुंबई, दि. 11 : मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. तसेच महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा आज आणि दि. १२ ऑक्टोबर रोजी मेळावा आयोजित केलेला आहे. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार तमिल सेल्वन, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बचत गटांचे स्टॉल लावल्यास नागरिकांनादेखील किफायतशीर किंमतीत वस्तू उपलब्ध होतील. मुंबई शहरातील बचत गटांसाठी दिवाळीपूर्वी हा मेळावा आयोजित केल्यामुळे, बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होईल. आज महिलांना कर्ज देताना बँकासुद्धा पुढे येत आहेत. कारण महिला बचत गटांना दिलेले कर्ज महिला 100 टक्के परतफेड करतात त्याचबरोबर महिला बचत गटाचा उद्योग वाढवण्याबरोबर आपल्या कुटुंबालादेखील बचत गटाच्या माध्यमातून हातभार लावत असतात. महिला सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. माविममार्फत उत्पादित वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग यावर भर देण्यात यावा.
दिल्ली येथे भरवण्यात येणारे महिला बचत गटांचे प्रदर्शन तसेच ‘सरस’ सारख्या प्रदर्शनांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची ही चळवळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले.
बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळून देणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, सध्या कोरोनानंतर मोठ्या उत्साहात सर्व सण साजरे केले जात आहेत. शहरातील बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन दिवसीय दिवाळी मेळावा आयोजित केला आहे. मुंबई शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच महिला बचत गट यांच्यासाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यान देखील ठेवले आहेत. महिला बचत गटांना राज्य, केंद्र शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना एकत्रितपणे राबवून त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्याची ऑनलाईन साहित्य विक्री व्हावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. महिला बचत गटांचे उत्पन्न तिप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप
रुपाली माने यांच्या सिद्धीविनायक महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये १० लाख, अपर्णा कोरडे यांच्या हयात महिला बचत गटाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून रुपये ७ लाख, बसलिम गम्मा मेकरी यांना आशू महिला बचत गटाला एचडीएफसी बँकेकडून ९ लाख रुपये गटांना बँकेमार्फत मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
महिला उद्योजकांना व्यावसायिक किटचे वाटप
श्रद्धा महिला बचत गटाच्या कविता कांबळे यांना ब्युटी पार्लर साहित्य, संकल्प महिला बचत गटाच्या मनाली सावंत यांना शिलाई मशीन, पंचशील बचत गटाच्या वनिता सुखदान यांनी किचन सेट अप चे वितरण करण्यात आले.
यशस्वी महिला उद्योजकांची माहिती
स्पार्कल महिला बचत गटाच्या स्नेहा भालेराव, इलेक्ट्रोफाइल रिसायकलिंग व्यवसाय, मदर सेंट मेरी महिला बचत गटाच्या जयश्री भंडारी, अंगणवाडी पोषण आहार व कटरिंग, भिमाई महिला बचत गट श्रीमती कमल सोनवणे, मसाला व्यवसाय यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
बचत गट स्टॉलला मान्यवरांनी दिली भेट
माविममार्फत ९० स्टॉल लावण्यात आले आहेत. दिवाळी सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कंदील त्यात बांबूचे कंदील, घरगुती फराळ, बांबूच्या परड्या, वारली पेंटिंगचे दिवे, विशिष्ट प्रकारचे तोरण, घरगुती ज्वेलरी, काथ्यापासून बनवलेली उत्पादने यांचा समावेश आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शनाला भेट देऊन तेथील बचत गटांसमवेत संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रूबल अग्रवाल यांनी केले. आभार माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळ सराफ यांनी मानले. सूत्रसंचालन चैताली कानेटकर यांनी केले.
******
संध्या गरवारे/विसंअ/