मुंबई दि.१४ :- महाराष्ट्राला थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ यांची परंपरा लाभलेली आहे. यांच्या विचाराने महाराष्ट्र घडला आहे.’पुस्तकांचे गाव’ या सारखे उत्तम उपक्रम शासनातर्फे राबविले जात आहेत. समृध्द मराठी भाषेचे महत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असल्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते, अभिवाचनाच्या कट्ट्याचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, भाषा संचालक विजया डोनीकर, भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी उपस्थित होते.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, साहित्याची आवड ही वाचनातूनच होत असते. त्यामुळे शाळांमध्ये वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जे लोक वाचन करतात त्यांनाच वाचनाचे महत्व कळत असते त्यामुळे शासनही त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
वाचनाची परंपरा समृद्ध आहे : भाषासंवर्धक ग्रंथसखा श्यामसुंदर जोशी
भाषासंवर्धक ग्रंथसखा श्री. श्यामसुंदर जोशी म्हणाले, पुस्तक वाचनातून समाज वाचन, स्वभाव वाचन, संस्कृती वाचन, लिपी वाचन करायला शिकता आले पाहिजे. वाचन संस्कृतीचा प्रवास भीमबेटकातील चित्रांपासून, शिलालेखांपासून तंजावुर मधील हस्तलिखित, दोलामुद्रितांपर्यंत असा आहे. वाचनाची ही परंपरा समृद्ध आहे. आपली वाटचाल पेपरलेस ग्रंथालयांकडे जरी होत असली तरी वाचन संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही.शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. साहित्याची आवड वाचनातूनच निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये प्रयत्न केल जात आहेत असेही ते म्हणाले.
वाचनानेच मी घडले : जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी. निधी चौधरी म्हणाल्या, वाचनानेच मी घडले सध्या मी इ-फॉर्म किंवा डिजीटल स्वरूपामध्ये वाचन करते. वर्षभरात ३६५ पुस्तकं वाचायची असा संकल्प करून गेल्या वर्षभरात मी ४१० पुस्तकं वाचली. सुप्रसिद्ध लेखक एस. एल. भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले ‘पर्व’ हे पुस्तक मी ३ ते ४ वेळा वाचले आहे. टॉलस्टॉय, भैरप्पा वाचल्यावर दिवसभरात आलेला मानसिक थकवा जातो. आयुष्यात महाभारत मला खूप प्रेरक ठरले,असेही त्या म्हटल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवाचन कट्टयात सहभाग घेतला. एकूण २८ सहभागींना भाषा संचालनालयाकडून प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आले भाषा संचालनालयाचे प्रकाशन असलेली भारताचे संविधानाची द्विभाषी प्रत देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
०००
विसअ/अर्चना शंभरकर/मराठी भाषा विभाग