औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : पोलिस आयुक्तालयाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, योजना, सुविधांचा आढावा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज घेतला. पोलिस यंत्रणा सक्षम राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी पोलिस विभागाला दिली.
पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात पालकमंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीस आमदार प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, उज्ज्वला वनकर, दीपक गिऱ्हे आदींसह वरीष्ठ पोलिस अधिकारी आदी उपस्थित होते.
कमांड कंट्रोल सेंटर, नियंत्रण कक्ष, सायबर पोलिस स्थानक, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन केंद्राची पाहणी श्री. भुमरे यांनी केले. यासह विशेष शाखा, गुन्हेगारावर वचक राहण्यासाठी पोलिस यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना, मनुष्यबळ, वाहनांची स्थिती, तुरंत 24,निरामय आरोग्य योजना, भरोसा सेल, विशाखा समिती, दामिनी पथक आदींचा आढावा श्री. भुमरे यांनी घेतला. श्री. गुप्ता यांनी यासंबंधी सविस्तर माहिती श्री. भुमरे यांना दिली.
*****