Home शहरे अकोला पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या दर्जेदार सुविधांसह पर्यटनाला चालना देणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या दर्जेदार सुविधांसह पर्यटनाला चालना देणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

0
पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकासासोबतच आरोग्य व शिक्षणाच्या दर्जेदार सुविधांसह पर्यटनाला चालना देणार – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

  • नंगारा वास्तु संग्रहालयाच्या 68 कोटी रुपयांचा वाढीव खर्चास मान्यता
  • 312 कोटी रुपयांच्या पोहरादेवी-उमरी विकास आराखडयास मंजूरी
  • आरोग्य, शिक्षण व पर्यटन विकासाला चालना देणार

वाशिम, दि. 14 (जिमाका) :  देशातील कोटयवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य तिर्थक्षेत्र आहे. विविध राज्यातून पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन पोहरादेवीचा विकास करण्यात येत आहे. नंगारा वास्तु संग्रहालयातून बंजारा समाजाची प्रेरणादायी संस्कृती व विकासाची ओळख होणार आहे. यासोबतच पोहरादेवी येथे लवकरच आरोग्य व शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच पर्यटन विकासाला चालना देण्यात येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तु संग्रहालय सभागृहात श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखडयाचा आढावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित सभेत घेतांना श्री. राठोड बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी व शैलेश मिणा, धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, अधिक्षक अभियंता विशाल जवंजाळ, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, महावितरणचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. वानखेडे, जिल्हा जलसंधारण लक्ष्मण मापारी, वास्तु संग्रहालयाचे वास्तुविशारद हबीब खान व अभय येवताडेकर, सार्वजनिक बांधकाम विद्यूत विभागाच्या उपअभियंता श्रीमती बोकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. राठोड म्हणाले, वेगवेगळया राज्यातील ज्या व्यक्ती बंजारा समाजावर पी.एच.डी. करणार आहे, त्यांच्यासाठी नंगारा ही वास्तु महत्वाची व अभ्यासपुर्ण ठरणार आहे. पोहरादेवी येथे तिर्थक्षेत्र विकासासोबतच बॉटनिकल गार्डन तयार करुन पर्यटन विकासाला चालना देण्यात येईल. त्यामुळे सर्व समाजातील लोक मोठया संख्येने तिर्थक्षेत्रासोबतच पर्यटन केंद्राला भेटी देण्यासाठी येतील. पोहरादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करुन लवकरच प्रशस्त जागेत बांधकाम करण्यात येईल. गावातील व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. ई-लायब्ररीची व्यवस्था सुध्दा करण्यात येईल. पोहरादेवीला भविष्यात शैक्षणिक हब म्हणून विकसीत करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोहरादेवी विकास आराखडा हा पुर्वी 100 कोटी रुपयांचा होता असे सांगून श्री. राठोड म्हणाले, आता या आराखडयामध्ये 67 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा आराखडा आता 167 कोटी रुपयांचा झाला आहे. आजच्या या सभेत 67 कोटी रुपयांच्या वाढीव आराखडयाला मंजूरी देण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत याला मान्यता घेऊन त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील मंजूरी घेण्यात येईल. पोहरादेवीच्या चारही भागातून जोडणाऱ्या कच्च्या रस्त्यांचे पक्क्या रस्त्यात रुपांतर करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या रस्त्यांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. वाई ते पंचाळा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल. वाई ते धानोरा दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आल्याचे ते म्हणाले.

श्री. राठोड पुढे म्हणाले, पोहरादेवी आणि उमरी या दोन्ही गावांचे मोठे धार्मिक महत्व आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा 312 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडयाच्या माध्यमातून तेथील धार्मिक स्थळांचा विकास करण्यासोबतच भाविकांची निवासाची व्यवस्था, सभागृह, अंतर्गत रस्ते, पथदिवे, भूमिगत गटार, जिल्हा परिषद शाळांची दर्जावाढ, गावामध्ये अद्ययावत वाचनालय सोबतच उत्तम दर्जाच्या अंगणवाडीचे बांधकाम यासह विविध विकास कामे या दोन्ही गावांमध्ये करण्यात येतील. आजच्या सभेत या विकास आराखडयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. गावाच्या विकासासाठी दानशूर जमीनदात्यांची जमीन गावाच्या विकासासाठी घेण्यात येईल. नंगारा वास्तु संग्रहालयाच्या चौथ्या आणि पाचव्या माळयावरील विविध विकास कामे 7 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्यात यावी. कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करु नये. तिर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे उत्तम दर्जाची असावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी नंगारा वास्तु संग्रहालयामध्ये ज्या सुविधा तसेच बंजारा संस्कृती व समाज जीवनाचे तसेच सेवालाल महाराजांचा जन्म, त्यांच्या जीवनातील प्रसंग, बंजारा समाजातील होळी सण उत्सव, स्वातंत्र्य चळवळीत बंजारा समाजाचे योगदान, देशपातळीवर बंजारा समाजातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळालेले व्यक्ती याबाबतची माहिती व प्रदर्शन या म्युझियममध्ये राहणार आहे. याबाबतचे सादरीकरण अभय येवताडकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविले. 312 कोटी रुपयांच्या पोहरादेवी- उमरी विकास आराखडयाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

पालकमंत्री संजय राठोड यांचे पोहरादेवी येथे आगमन होताच त्यांनी देवी जगदंबा मातेचे, संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज व संत बाबनलाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

*******