Home बातम्या भारतावर घोंगावते आहे मोठे जलसंकट

भारतावर घोंगावते आहे मोठे जलसंकट

0

जागतिक संस्थेच्या अहवालातील निष्कर्ष

वॉशिंग्टन: जगातील ज्या सतरा देशांमध्ये मोठ्या जलसंकटाची स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे त्यात भारताचाही समावेश आहे. भारतात आजच अनेक भागातील पाणी साठा जवळपास शुन्यावर पोहचला असून भविष्यात हे संकट अधिक गहिरे होत जाणार आहे असे एका जागतिक पहाणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट तर्फे पाणीसाठ्याच्या उपलब्धतेबाबत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात जगातील 189 देशांतील पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती तपासण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की जगातील एकूण 17 देशांतील पाणी साठे वेगाने संपत आहेत, काही ठिकाणी तर अगदी पाण्याची उपलब्धता शुन्यावर आली आहे अशा देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.भीषण पाणी टंचाई निर्माण झालेल्या पहिल्या काही देशांमध्ये भारत तेराव्या क्रमांकावर आहे. उत्तरभारतातील भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. चेन्नाईत जी भीषण पाणी टंचाई या उन्हाळ्यात भेडसावली होती त्या वृत्ताकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या साऱ्यापार्श्‍वभूमीवर भारत या पाणी टंचाईवर कशा पद्धतीने मात करू शकतो याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

देशात पडणाऱ्या पावसाची खात्रीशीर नोंद करून आणि त्याचा आढावा घेऊन जमीनीवरील आणि जमीनीखालील पाणी साठ्या बाबत भारताला नेमके धोरण निश्‍चीत करावे लागेल असे या संस्थेतील भारताचे प्रतिनिधी शशी शेखर यांनी म्हटले आहे. जलसाठ्याबाबत अचुक माहिती संकलीत करून त्यावर उपाययोजना कराव्या लागतील असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या सतरा देशांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे त्या देशांमध्ये कृषी, उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी उपलब्ध एकूण पाणीसाठ्यापैकी 80 टक्के पाणी लागते, त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये जराजरी टंचाई निर्माण झाली तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम या देशांना भोगावे लागणार असल्याचा इशाराही यात देण्यात आला आहे.