Home शहरे कोल्हापूर संकटकाळी कोल्हापूर धावले कोल्हापूरकरांसाठी!

संकटकाळी कोल्हापूर धावले कोल्हापूरकरांसाठी!

0

कोल्हापूर : महापुरात अडकलेले वृद्ध नागरिक, महिला, लहान मुले यांच्यासह हजारो कोल्हापूरकरांना मदत करण्यासाठी कोल्हापूरकरच धावले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापुरांच्या दातृत्वाचे हजारो हात पुढे आले आहेत. हजारो कुटुंबांना जेवण, कपडे, ब्लॅकेटस, चादरी, औषधे, प्रथमोपचार अशा सुविधा देण्यासाठी रात्रंदिवस अनेक व्यक्ती, संस्था, जैन व राज्यस्थानी समाज व इतर संघटनांचे कार्यकर्ते झटत आहेत.

महापुरामुळे हजारो घरं पाण्याखाली गेल्याने अंगावरच्या कपड्यानिशी आणि हाताला येईल तेवढे जीवनावश्यक सामान घेवून हे नागरिक सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री घराबाहेर पडले. सीता कॉलनी येथील ६० नागरिकांचे दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. येथे जैन सोशल ग्रुप सिल्व्हर लीप या संघटनेने जेवण, ब्लँकेटस, चादरी दिल्या. स्वरा फौंडेशन, स्मार्ट वन, राजारामपूरी मंडळ, इस्कॉनचे दिपक सपाटे आदींनी मदत केली. चित्रदुर्ग मठात २७ कुटुंब आणि ९० माणसे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी श्रृंगार ग्रूपने जेवणाची सोय केली.

मुस्लिम बोर्डिंगमध्ये सोमवारी केवळ आठ कुटुंब स्थलांतरित झाली होती बुधवारी ही संख्या ५० कुटुंब आणि १०२ नागरिकांवर गेली. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, सरनाईक वसाहत मुस्लीम जमात, करवीर गर्जना यांनी जेवण दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आपत्कालीन पथकाद्वारे मदत केली.

तीनही दलांच्या मदतीमुळे मदतकार्याला वेग – पाटील
खराब हवामानामुळे कोल्हापुरात येवू न शकलेली विमाने, हेलिकॉप्टर्स दाखल होवून मदतकार्य सुरू झालेले आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असून लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कामगिरीमुळे मदतकायार्ला वेग आल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह बुधवारी दुपारी तीन वाजता महावीर कॉलेजजवळ सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली. पाटील म्हणाले, पाऊसच एवढा झाला की कोयनेपासून ते राधानगरी धरणापर्यंत सर्व धरणांमधून पाणी सोडावे लागले. अन्यथा धरणांना धोका झाला असता. मंगळवारीच एक विमान कोल्हापूरला येण्यासाठी निघाले होते. परंतू खराब हवामानामुळे ते पोहोचू शकले नाही. गोव्याहून निघालेले हेलिकॉप्टरही रत्नागिरीहून परत गेले. परंतू आज हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या बोटी दाखल झाल्या आहेत.

ही यंत्रणा कुणी कामाला लावली?
जनतेला वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केल्याबाबत पाटील म्हणाले, पालकमंत्री कुठे आहेत अशी विचारणा काहीजण करत आहेत. परंतू रात्री दीड, दीड वाजता मी आणि जिल्हाधिकारी बोलत आहोत. ही यंत्रणा कुणी कामाला लावली, असे त्यांनी विचारले.

नाशिक : ४ हजार लोक सुरक्षित
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात राबविण्यात आलेल्या बचाव कार्यात ३,९४० जणांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, तर सटाणा तालुक्यातील आरम नदीच्या पुरातून एका तरुणास वाचविण्यात यश आले.

मराठवाडा : जायकवाडी ६० टक्के उर्वरित प्रकल्पांत मात्र ठणठणाट औरंगाबाद : नाशिक-नगर जिल्ह्यांत झालेला दमदार पाऊस कोरड्या मराठवाड्याला पावला. आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६० टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे.

बीड : पाण्याचे ७९५ टँकर सुरूच बीड जिल्ह्यात ऐन पावसाळ््यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक, तर इतर प्रकल्प जोत्याखाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत़ त्यापैकी १० कोरडे असून ७ प्रकल्प जोत्याखाली आहेत़

पंढरपूर : संपर्क तुटला… उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढपुरात भीमा नदीवरील तिन्ही पूल पाण्यात गेले. बुधवारी दुपारपासून पंढरपूरचा संपर्क तुटला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. उजनी धरण मंगळवारी शंभर टक्के भरले.

पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीची मागणी
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत १६ नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.