पुणे : परवेज शेख
सध्या विविध जिल्ह्यात पूरस्थिती आणि अतिवृत्ष्टीचा इशारा दिलेला असताना चुकीची खोटी माहिती पसरवली जात आहे. या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले आहे.
आयुक्तांनी याबाबत सर्व शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हा मेसेज पाठवला आहे. हा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलीस आयुक्तांनी केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून पुणे शहर, परिसर आणि राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
त्यामुळे नद्या, नाले व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. परंतु या काळात धरण फुटलेले, रस्ते खराब झाला, पूल कोसळला, बंधाऱ्याला तडे गेले, रस्ता खचला, रस्ते पाण्याखाली गेले असे अफवा पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असल्याचे देखील अफवांचे मेसेज पसरविले जात आहेत. नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांनी अधिकृत माहितीसाठी व मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्ष (०२० २६१२६२९६) आणि पुणे पोलीस व्हॉट्स अॅप ८९७५२८३१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी कळविले आहे.