Home बातम्या महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द

महाजनादेश यात्रेच्या अखेरच्या दिवसाचे कार्यक्रम रद्द

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे उद्या शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मा. देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वतः मदतकार्यात पुढाकार घेतला असल्याने महाजनादेश यात्रेचे शुक्रवारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात्रा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

मूळ नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होता व त्या दिवशी धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कार्यक्रम नियोजित होते. तथापि, राज्याच्या काही जिल्ह्यातील पूरस्थिती ध्यानात घेऊन मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी अकोला येथून महाजनादेश यात्रेतून मुंबईकडे प्रयाण केल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी त्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यातील मदतकार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गुरुवारी सकाळी ते कोल्हापूर येथे दाखल झाले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेचे शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.