Home शहरे मुंबई पुराच्या पाण्यात कार, बाईक बुडालीय; दुरुस्तीची चिंता सतावतेय का?

पुराच्या पाण्यात कार, बाईक बुडालीय; दुरुस्तीची चिंता सतावतेय का?

0

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पूरस्थिती आहे. मुंबईनंतर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे आदी ठिकाणी पूरस्थिती ओढवली होती. सध्यातर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये महापूर आलेला आहे. कोल्हापूरचा रस्ते संपर्कच तुटलेला आहे. पुणे- बंगळुरू रस्त्यावर तर आठ फूट पाणी साचले होते. यामध्ये हजारो गाड्या अडकल्या आहेत. पुराच्या पाण्यात गाडी गेली असेल तर काय करायचे? असा प्रश्न पडला असेल.


महत्वाचे म्हणजे पुराच्या पाण्यात गाडी किती उंचीपर्यंत बुडाली याचा विचार केला जातो. बंपरपर्यंत, डॅशबोर्ड की टपापर्यंत ही बाब लक्षात घेतली जाते. कारचा इन्शुरन्स असल्यास ती कार कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच न्यावी. कारण कार जर पुराच्या पाण्यात अडकली असेल तर इन्शुरन्समध्ये दुरुस्त करता येते. पण जर मुद्दामहून समोर पाणी दिसत असूनही कार पाण्यात घातली असल्यास कंपनी इन्शुरन्स नाकारते. 

कार पाण्यात गेल्यास तिचे इंजिनामध्ये पाणी जाते. यामुळे इंजिन सीज होते. अशावेळी झिरो डेप इन्शुरन्स असल्यास आणि त्यातही इंजिन प्रोटेक्शन घेतलेले असल्यास आणखी फायद्याचे ठरते. त्याशिवाय कारमधील अन्य इलेक्ट्रीक पार्टही खराब होतात. उदा. म्युझिक सिस्टिम, एसी, अॅटोमॅटीक विंडो, ईसीएम, अॅटो ओआरव्हीएमसारखे पार्ट खराब होतात. 


सर्व्हिस सेंटरचे इन्शुरन्स कंपन्यांशी टायअप असते. शिवाय ओरिजनल पार्टही बदलून मिळतात. सर्व्हिस सेंटर तुमच्या कारची दुरुस्ती करण्याचे इस्टिमेट इन्शुरन्स कंपनीला पाठवते. मात्र, यामध्येही काही अटी आहेत. 
इन्शुरन्स काढताना कंपन्या तुमच्या कारची आयडीव्ही व्हॅल्यू ठरवितात. ही रक्कम तुमच्या कारच्या वयोमानानुसार ठरते. जर दुरुस्तीची रक्कम या आयडीव्ही व्हॅल्यूच्या 75 ते 80 टक्क्यांपेक्षा जास्त जात असेल तर कंपन्या कार डॅमेज दाखवितात. मात्र, जर ही रक्कम कमी येत असेल तर दुरुस्तीचा क्लेम देतात. 

बाहेरची फिटिंग असल्यास काय?
समजा तुमच्याकडे बेस मॉडेल आहे आणि तुम्ही म्युझिक सिस्टिम, कॅमेरा, पार्किंग सेन्सर, फॉग लँप आदी बाहेरून लावून घेतले असतील तर इन्शुरन्स काढतेवेळी त्याची बिले देऊन ती जादा रक्कम भरून इन्शुरन्समध्ये घ्यावी. अन्यथा ती डॅमेज झाल्यास इन्शुरन्समधून त्याचा क्लेम होणार नाही. 
जर कंपनी फिटेड असल्यास ती इन्शुरन्समध्ये क्लेम होते. काही गॅरेजही इन्शुरन्स क्लेम करून देतात. मात्र, असे गॅरेज ओळखीचे असतील तरच त्यांच्याकडे दुरुस्ती करणे चांगले असते. 

कंपनीने कार डॅमेज केल्यास काय?
जर आयडीव्ही व्हॅल्यूपेक्षा कारचा दुरुस्ती खर्च जास्त जात असेल तर कंपन्या कार डॅमेज करतात आणि ती कार स्क्रॅपला देतात. जर तुमच्या कारची आयडीव्ही व्हॅल्यू 6 लाख असेल आणि स्क्रॅपमध्ये या कारला 2 लाखांची किंमत येत असेल तर इन्शुरन्स कंपनी 4 आणि स्क्रॅपचे 2 असे सहा लाख रुपये तुम्हाला दिले जातात. 
जर तुमचा इन्शुरन्स रिटर्न टू इन्व्हाईस असेल तर आयडीव्ही व्हॅल्यू नाही तर तुमच्या कारची ऑन रोड प्राईस दिली जाते. यामध्ये फक्त इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत. यामुळे इन्शुरन्स घेताना काही हजाराचा विचार न करता योग्य संरक्षण घेणे गरजेचे असते. अन्यथा दोन चार हजारासाठी लाखोंचे नुकसान होते.