पुणे : परवेज शेख
गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ६० हजार रुपये किंमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई येरवडा येथील ताडीगुत्या समोरील सार्वजनीक रस्त्यावर करण्यात आली. अनिल महादेव जाधव (वय-२५ रा. पेरणेफाटा, रामनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी रमेश चौधर आणि निलेश शिवतरे यांना ताडीगुत्यासमोरील सार्वजनीक रोडवर एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ किलो गांजा आढळून आला. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पाेलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी रमेश चौधर, निलेश शिवतरे, गणेश साळूंके, राजू मचे, शंकर पाटील, रमेश राठोड, सागर घोरपडे, सचिन ढवळे, सुहास कदम यांच्या पथकाने केली.