Home गुन्हा ११ अल्पवयीन मुलींची सुटका; केरळातील धर्मगुरुकडून चालविले जात होते वसतीगृह

११ अल्पवयीन मुलींची सुटका; केरळातील धर्मगुरुकडून चालविले जात होते वसतीगृह

0

मडगाव : मडगावपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवा परिसरात मागची तीन वर्षे एका केरळी धर्मगुरुकडून बेकायदेशीररित्या लहान मुलांचे वसतीगृह चालविले जात असल्याचे उघडकीस आले असून गोवा मानव तस्करी नियंत्रण विभागाकडून काल बुधवारी झालेल्या कारवाईत ४ ते १२ वर्षे वयोगटातील ११ मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. या धर्मगुरुच्या विरोधात गोवा बाल कायद्याखाली गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

गरीब घरांतील लहान मुलांना आसरा देण्याच्या बहाण्याने कोलव्यात उघडलेले हे वसतीगृह मागची तीन वर्षे बेकायदेशीररित्या कोलव्यातील एका बंगल्यात चालू होते. केरळातील प्रोटेस्टन्ट पंथाचा पास्टर (धर्मगुरु) बिजू झाकारिया हा चालवत होता. सदर झाकारिया एक एन्जीओ संस्थाही चालवत असून ही संस्था कायदेशीर आहे की नाही याचाही पोलीस तपास करत आहेत. क्राईम ब्रँचचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, कोलव्यातील एका बंगल्यात हे वसतीगृह चालू होते. गोवा बाल कायद्याप्रमाणो अशी वसतीगृहे नोंदणीकृत असणो आवश्यक आहे. मात्र कुठल्याही नोंदणीविना हे वसतीगृह चालू होते. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही आली होती. सध्या झाकारिया याच्या विरोधात गोवा बाल कायद्याच्या ८ व ९ कलमाखाली गुन्हा नोंद करुन पुढील चौकशी चालू आहे.

बुधवारी पणजीच्या मानव तस्करी नियंत्रण कक्षाने या वसतीगृहावर छापा मारत ४ ते १२ वर्षे वयोगटातील ११ मुलींना ताब्यात घेतले होते. सध्या या मुलींना मेरशीच्या अपना घरमध्ये ठेवण्यात आले आहे. या वसतीगृहात केवळ मुलींनाच ठेवण्यात येत होते की मुलांनाही याचाही पोलीस शोध घेत आहेत. ज्या ११ मुलींची या वसतीगृहातून सोडवणूक केली आहे. ती सर्व मुले गरीब कामगार वर्गाची असून या वसतीगृहाबद्दल चर्चच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली होती अशी माहिती या पालकांनी पोलिसांना दिली आहे. आमच्या मुलांचे चांगल्याप्रकारे संगोपन व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठीच आम्ही त्यांना या वसतीगृहात ठेवले होते, अशी माहिती या पालकांनी पोलिसांना दिली आहे. अधीक्षक पंकजकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, सीडब्ल्यूसीकडे आम्ही संपर्क साधला असून ताब्यात घेतलेल्या मुलींचा ताबा कुणाकडे द्यावा या संबंधात ही समिती निर्णय घेणार आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ ते ६ पालकांचे जबाब आम्ही नोंद करुन घेतले असून या जबान्यातील सत्यता पोलीस पडताळून पहात आहेत असे ते म्हणाले.