नवापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित मिळणार उपचार‍ – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नवापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरित मिळणार उपचार‍ – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
- Advertisement -

नंदुरबार, दि.10 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा):  नवापूर येथील अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नवापूर येथे नूतन ट्रॉमा केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळा डॉ.गावित यांच्या हस्ते काल संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य भरत गावित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, शल्यचिकित्सक डॉ.राजेश वसावे, तहसिलदार मंदार कुळकर्णी, न.पा.मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पाडवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा वळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत वसावे  यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह नगरसेवक, माजी नगराध्यक्षा, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.गावित म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून केंद्र व राज्यसरकारच्या सहकार्याने नागरिकांना दळणवळणासाठी  चांगले रस्ते निर्माण होत आहे. नवापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असल्याने यामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते, त्यामुळे या मार्गावर अपघात झाल्यास जखमींना व परिसरातील नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी या ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होऊन  भविष्यात अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकणार आहे.

पुढे बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, ज्यावेळी मी आरोग्य राज्यमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी व इतर सुविधांसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार केला होता.  त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते, दळणवळणाच्या सुविधेसाठी राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणावर  सरकारने बांधण्यासाठी घेतले  दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यात पण त्यावेळी मोठ्या संख्येने अपघात व्हायला लागले. अपघात होत असतांना सरकारने एक आराखडा तयार करण्याचे ठरविले. ट्रॉमा केअर सेंटर कुठे कुठे उभे केले पाहिजे  यासाठी त्यावेळी स्थापन झालेल्या समितीने नवापूर येथे  ट्रॉमा सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले आणि जिल्ह्यातील पहिल्या आधुनिक अशा सुसज्ज इमारत आज ऊभी राहिली असून या सेंटरचा नागरिकांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘भारत माला’ योजनेमार्फत सोनगीर-दोंडाईचा-नंदुरबार-विसरवाडी पर्यत चारपदरी रस्ता तयार करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच याचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढल्या असून मेडीकल कॉलेज सुरु झाल्यामुळे येथे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील अशा वेळी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अशा ठिकाणी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात येईल.

ट्रॉमा केअर सेंटरमुळे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार

जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, जास्तीत जास्त अपघात हे राष्ट्रीय महामार्ग व गावानजीक होत असतात त्यामुळे अशा अपघातग्रस्तावर त्वरीत उपचारासाठी या ट्रॉमा केअर सेंटरचा परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. नवापूर येथे उपजिल्हा रुग्णालय होते. याठिकाणी अपघातग्रस्तावर उपचारासाठी सोईसुविधा कमी होत्या आता या ट्रॉमा केअर सेंटरमुळे चांगले तज्ञ डॉक्टर व मनुष्यबळ येथे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ.गावित म्हणाल्या की, अत्यंत चांगली अशी सुसज्ज अशी ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी झाली याचा मला अत्यंत आनंद होत आहे. कोरोनाकाळातही नवापूर येथे आवश्यक बेड उपलब्ध नव्हते त्यावेळी ट्रॉमा केअर सेंटर इमारतीचा उपयोग पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत वेगात सुरु असून  पुढच्या दोन तीन महिन्यात हा महामार्ग  सुरु होईल. चांगले रस्ते तयार झाले तर  वाहनांचा वेगही वाढतो त्यामुळे अशा वाहनांचा अपघातही होतो त्यावेळी एखाद्या अपघातग्रस्त रुग्ण हा रुग्णालयात येतो त्यावेळी त्यासोबत असणारा व्यक्तीं त्याला असणारे आजार सांगतो त्यानंतर डॉक्टर त्या रुग्णावर उपचार करतात. पंरतू अपघात ही अशी दुदैवी घटना असते ज्यावेळी असे अपघात होता त्यावेळी त्यावाहनात प्रवास करणारे सगळेच गंभीर  असतात त्यावेळी कोणीही अशावेळी त्या रुग्णाला काही आजार आहे का याबाबत सांगू शकत नाही.अशा वेळी डॉक्टराची धावपळ होतो त्यामुळे अशा अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

असे आहे ट्रॉमा केअर सेंटर

राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्या रुग्णांना तसेच स्थानिक रुग्णांना तत्काळ अत्यावश्यक वैद्यकिय सेवा उपलब्ध होण्यासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकिय उपकरणांसह ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले असून या रुग्णालयात 20 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच याठिकाणी अपघात विभाग, एक्स-रे विभाग, सोनाग्राफी विभाग, आय.सी.यु विभाग, ऑपरेशन थेअटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयात अस्थिरोग तंज्ञ, बधीरीकरण तज्ञ, अपघात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी असे एकूण 15 अधिकारी कर्मचाराऱ्यांची पदे मजूर आहेत.

या विकास कामाचे झाले भूमिपूजन

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य भरत गावित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, तहसिलदार मंदार कुळकर्णी, मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पाडवी यांच्यासह नगरसेवक, माजी नगराध्यक्षा  तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

✅ नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम करणे 170.19 लक्ष.

✅ नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील वर्ग-4 कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे 139.57 लक्ष.

✅ नवापूर येथील राज्य महामार्ग 53 ते नवापूर शहर रस्त्यावर रंगावती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे 170.19 लक्ष.

✅ नवापूर नगरपरिषद नवापूर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा योजनेतंर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात चौक सुशोभीकरण करणे 33 लक्ष 74 हजार.

- Advertisement -