Home ताज्या बातम्या शेतकऱ्याचे पंतप्रधानांना रक्ताने लिहिलेले पत्र

शेतकऱ्याचे पंतप्रधानांना रक्ताने लिहिलेले पत्र

0

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील शेतक-याने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात ७ मार्च पासून सुरु केलेले अर्धनग्न आंदोलन सरकार बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कृष्णा डोंगरे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या रक्ताने लिहिलेले पत्र पाठवित आपली व्यथा मांडली आहे.
डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केली. मात्र आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येवला येथील सभेत त्यांच्यापुढे गा-हाणे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांकडून नजरकैदेत ठेवले जात आहे. सदर आंदोलन विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सांगत डोंगरे यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या रक्ताने ११ पानी पत्र पाठविले आहे. निवेदनाच्या प्रती राष्ट्रापती रामनाथ कोविंद व समाजसेवक अण्णा हजारे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.