Home गुन्हा ८३ लाखांचा दारूसाठा पकडला

८३ लाखांचा दारूसाठा पकडला

0

वर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कारंजा (घा.) येथील टाल नाक्याजवळ नाकेबंदी करून ट्रेलरसह ८३ लाखांचा दारूसाठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील कारंजा नजीकच्या टोल नाक्यावर नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. यावेळी आर. जे. १९ जी. ए. ८५३२ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला.
ट्रक चालकाला दारूची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची विचारणा केली असता ते त्याच्याकडे नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारूसाठ्यासह दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रेलर जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक सुभाष बोडके यांच्या निर्देशानुसार मोहन पाटील, दिलीप वल्के, मिलींद लांबाडे, हरिदास सुरजुस, बंडू घाटुर्ले यांनी केली. हा दारूसाठा कुठे नेल्या जात होता याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत आहे.
भुशात लपविल्या होत्या दारूच्या पेट्या
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ट्रेलरची बारकाईने पाहणी केली असता ट्रेलरमधील भुशात दारूच्या पेट्या लपवून त्या दारूची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रेलरसह एकूण ८३ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३, १०८ नुसार कारवाई केली आहे.
कारसह दारूसाठा जप्त
समुद्रपूर – आरंभा टोल नाक्याजवळ पोलिसांनी नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. याच दरम्यान पोलिसांनी एम.एच. ३२ ए. एम. ५२७० क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारमधील इंद्रजित भुपेंद्रसिंग भाटीया (३६) व अमरजित हरमेंद्रसिंग भाटीया (५०) दोन्ही रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध दारूबंदीकायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली.