Home ताज्या बातम्या नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी कृती आराखडा करा-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी कृती आराखडा करा-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी कृती आराखडा करा-पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 6 (जि. मा. का.) : नद्या प्रदूषण विरहीत स्वच्छ राहण्याबरोबरच त्या प्रवाहित रहाव्यात यासाठी ‘चला जाणूया नदीला’ ही संधी समजून काम करूया आणि नदी प्रवाहित ठेवण्यासाठी आपले योगदान देऊया. नद्या अमृत वाहिनी करण्यासाठी समन्वय समिती व कार्यान्वयीन यंत्रणांनी कृती आराखडे करावेत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणू या नदीला या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक नीता कट्टी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, डॉ. समीर शिंगटे, संतोष भोर,  यांच्यासह नदी समन्वयक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, नद्यांचे पुनरूजीवन, स्वच्छता यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान महत्त्वाचे आहे. यासाठी नदी स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी समन्वय समितीने प्रचार व प्रसिध्दी करावी. नदी स्वच्छतेच्या कामांध्ये लोकसहभाग वाढवावा, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.  जिल्ह्यातील सात नद्यांच्या स्वच्छतेबाबत तालुकास्तरावर नोडल अधिकारी आणि कार्यान्वयीन यंत्रणांच्या तातडीने बैठका घ्याव्यात. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे काढण्याबाबत यंत्रणांनी काम करावे. चला जाणूया नदीला या अभियानात सांगली जिल्ह्याचे उठावदार काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नदी, समाज आणि शासन यांचा समन्वय महत्वाचा असल्याने चला जाणूया नदीला या अभियानात येणाऱ्या अडचणी सोडवू अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिली. या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीनांही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

या अभियान काळात नदीच्या आरोग्याची विविध प्रकारे काळजी घेतली जाणार असून त्यानुसार नद्यांच्या सद्य:स्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यावर आधारीत उपाययोजना सूचविल्या जाणार असून यासाठी गावागावांत नदी मित्र संघ निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांचा यामध्ये सहभाग असणार आहे. या कामासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नोडल अधिकारी कृषी, महसूल व अन्य अधिकारी यांच्याशी समन्वयाने काम करणार आहेत. अशी माहिती बैठकीत कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील यांनी दिली.

बैठकीस जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र व्होरा, कृष्णा नदी समन्वयक डॉ. मनोज पाटील, अग्रणी नदी समन्वयक अंकुश नारायणकर, महांकाली नदी समन्वयक सागर पाटील, संपतराव पवार उपस्थित होते.

०००००