Home शहरे अकोला कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त – महासंवाद

कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त – महासंवाद

0
कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त – महासंवाद

मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड देत मेळघाटातील एका अल्पभूधारक शेतकरी बांधवाने प्रगती साधली आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिजूधावडी नजिकच्या बारू या दुर्गम गावाचे रहिवासी किसन भुऱ्या कासदेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. डोंगराळ भागातील शेती, दळणवळणाची अल्प साधने, साधारण परिस्थिती या परिस्थितीतून मार्ग काढत श्री. कासदेकर यांनी मुख्य पीकांबरोबरच परसबाग, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करून उत्पन्नाचे स्रोत विकसित केले आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षापासून कासदेकर हे शेती करत आहेत. आपल्याकडे केवळ 1.53 हेक्टर शेती आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कमी जागेत अधिक उत्पन्न देणा-या पिकांचा, तसेच पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली. कृषी विभागाच्या कार्यशाळा, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, अभ्यास दौरे यातही ते आवर्जून सहभागी होऊ लागले. त्यांचा जिज्ञासा पाहून त्यांना अधिका-यांकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळू लागले.

 

शेतात सुरूवातीला पाण्याची सुविधा नसल्यामुळे केवळ खरीप पिके घेतली जायची. त्यानंतर कासदेकर यांनी शेतात विहिर निर्माण केली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील पीके घेता येणे शक्य झाले. कासदेकर यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मिरची, टमाटे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच उन्हाळ्यात भुईमुगाचे पीक घेण्यास सुरूवात केली.

या पिकांबरोबरच त्यांनी सर्व प्रकारचा भाजीपाला, मिरची, वांगी, मेथी, कोथिंबीर, चवळी, वाल, पुदिना, कढीपत्ता, लसूण, मुळा आदींचीही लागवड सुरू केली. त्याचबरोबर, त्यांनी शेताच्या बांधावर आंबा, सीताफळ, बांबू, शेवगा, पेरू, बोर, सुबाभूळ अशा फळझाडे व इतर झाडांची लागवड केली. शेताच्या बांधावर 127 विविध झाडे त्यांनी लावली. सफरचंद, सुपारी, फणस, द्राक्ष, नारळ अशा झाडांची लागवडही त्यांनी प्रायोगिक तत्वावर केली.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी परसदारातील कुक्कुटपालन सुरू केले. ‘ग्रामप्रिया’ कोंबडीचे पालन करून कमी गुंतवणूकीतही उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत कसा आकाराला येतो व कुपोषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी ते कसे लाभदायी ठरू शकते, त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दर्शवले. त्याचप्रमाणे, त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून बायोगॅस युनिट उभारले. गॅसनिर्मितीनंतर उर्वरित स्लरीचा त्यांनी गांडूळ खतनिर्मितासाठी वापर केला. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य व्यवस्थापन व वापर करून शाश्वत शेतीचे आदर्श उदाहरण कासदेकर यांनी निर्माण केले.

इतर शेतकरी बांधवांनाही ते पूरक व्यवसाय, तसेच विविध प्रयोगांबाबत सातत्याने मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, तसेच आदिवासी शेतकरी कृषीभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

– हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती  अधिकारी, अमरावती