Home ताज्या बातम्या भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि 10 जिमाका : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे 125 वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव  देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समारंभाध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख, खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रवीण पोटे, परिणय फुके, श्वेता महाले, प्रा.अशोक उईके,  संस्थेचे कोषाध्यक्ष दिलिपबाबू ईंगोले, संदीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

 

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.  तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व बालरोग विभागाची नवीन वार्ड इमारत आणि आकस्मिक दक्षता कक्षाचे उद्घाटन केले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी हे कृषी प्रदर्शन मैलाचा दगड ठरलेच शिवाय जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात भारताचे नवे पाऊल टाकण्याचे काम या प्रदर्शनाने केले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याने काम केले पाहिजे यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी भाऊसाहेबांनी घेतलेले निर्णय मूलगामी परिणाम करणारे ठरले आहेत.

समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे आणि आपला महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचे श्रेय भाऊसाहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्याला  जाते. समाजातील गरीबी, जातीयता, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याचा विचार समोर ठेवून त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज हा वटवृक्ष शिक्षणाच्या विविध क्षेत्रात मानव संसाधनांची निर्मिती करणारे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.

भाऊसाहेबांचे जाती प्रथा, अंधश्रद्धा निर्मुलन यासारखे समाजसुधारणेचे कार्यही बहुमोल आहे. अत्यंत ज्ञानी, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या या नेत्याचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहाेचविण्यासाठी संस्थेने सुरु केलेल्या त्यांच्या स्मृती केंद्राच्या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. त्यांच्या जन्मस्थानी पापळ येथे कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल आणि संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून मेळघाटमधील रुग्णांना ने-आण करण्यासाठी संस्थेला बस उपलब्ध करुन देण्याची तर आमदार सुलभा खोडके यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था म्हणून धर्मशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करुन निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.

यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांच्या विचारांची देवाण-घेवाण शासनाने घडवून आणावी, तसेच कृषी महविद्यालये सरसकट बंद करू नयेत अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे संचलन प्रा. किशोर फुले तर आभार दिलिपबाबु ईंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य, कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

000000