Home गुन्हा माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या अटक

माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या अटक

0

पुणे : परवेज शेख

माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक संघटनांच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींकडून याच पद्धतीने विविध प्रकारच्या व्यावसायिकांकडे खंडणी मागण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे.

ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू (वय 30, रा. शेख चाळ, शास्त्रनीगर, कोथरुड), ललित मारुती काकडे (वय 28, रा. राजयोग सोसायटी गणपती मंदिरासमोर, वारजे माळवाडी), महेश कालिदास परिट (वय 19, रा. शेलार कॉम्प्लेक्‍स, जयभवानी नगर, कोथरुड) व योगेश प्रकाश कानगुडे (वय 24, रा.सुतारदरा, शिवकल्याण नगर, कोथरुड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोथरुड येथील करिझ्मा सोसायटीजवळ एक हॉटेल आहे. तसेच हॉटेलसमोरील एका इमारतीमध्ये त्यांचे कॉफी शॉप असून त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. जुन महिन्यात त्यांच्या हॉटेलवर धर्मजिज्ञासू, काकडे, परिट व कानगुडे हे चौघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांना माथाडी कामगार संघटनेचे नाव असलेले एक पत्र दिले. त्यानंतर तुमच्या हॉटेलचे कामासाठी लागणारा माल उतरविण्यासाठी व चढविण्यासाठी तुम्ही हमालांचा वापर करीत नाहीत. त्याबदल्यात तुम्हाला आम्हाला दरमहा 18 हजार रुपयांची रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना सातत्याने प्रत्यक्ष भेटून व फोनवर पैसे देण्यासाठी धमकी दिली जात होते. फिर्यादींनी त्यांचे लग्न असल्याचे व कॉफी शॉपच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी बाहेरगावी असताना त्यांनी फिर्यादीचे हॉटेल बंद करुन त्यांना पुन्हा धमकी दिली. या सर्व प्रकारास कंटाळून फिर्यादींनी पोलिसांकडे खबर दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडुन सुरू होता. आरोपी कोणत्याही प्रकारची हमाली न करता माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी वसुल करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना अटक केली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे, संजय गायकवाड, राजेंद्र केंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ओम धर्मजिज्ञासू याच्याविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात 2009 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. याबरोबरच दुखापत करणे, पिस्तुल बाळगणे असेही गुन्हे त्याच्या नावावर आहेत.तो माथाडी कामगार संघटनेचा पुणे जिल्हाध्यक्ष व ललित काकडे हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत असल्याचे पोलिस चौकशीत त्यांनी सांगितले