Home शहरे अकोला शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर  महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांचा भर असणार आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सदर जागेचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

०००००

वर्षा फडके- आंधळे