Home बातम्या ‘अभिनंदन’ वर्धमान! स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ पुरस्काराने होणार ‘वीरपुत्राचा सन्मान’

‘अभिनंदन’ वर्धमान! स्वातंत्र्यदिनी ‘वीरचक्र’ पुरस्काराने होणार ‘वीरपुत्राचा सन्मान’

0

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्राने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांना वीरचक्र पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती. एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांची काही काळाने सुटका झाली होती.

बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा वीर चक्रानं सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय वायू दलातील वरिष्ठ अधिकारी (स्वाडूट लिडर)  मिंटी अग्रवाल यांनाही युद्ध सेवा मेडल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 15 ऑगस्टच्या स्वात्रत्र्यदिनी वीरचक्र पुरस्कार देऊन अभिनंदन वर्धमान यांचा गौरव होईल. अभिनंदन यांच्यासह ज्या वैमानिकांनी दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केलं आहे. त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार करण्यात येणार आहे. 

मिग-21 बायसन विमानानं एफ-16ला खाली पाडल्यानं हा जगभरात भारताच्या नावावर इतिहास आहे. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतातील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला. अभिनंदन यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते.