पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – महासंवाद

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – महासंवाद
- Advertisement -

शासन आपल्या दारी विशेष लेख

महाराष्ट्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” हे अधिक प्रभावी माध्यम आहे. रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. यासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे आहे.

राज्यातील बेरोजगार उमेदवारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री यांच्या उपस्थितीत नामांकित 44 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत तसेच, दि.20 एप्रिल, 2023 रोजी मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मा. अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सुमारे 1 लाख 35 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

सामंजस्य करारनामे करण्यात आलेले उद्योजक मॅन्युफॅक्चरींग, मीडिया, एंटरटेनमेंट, ॲटोमोबाईल, फूड, होम अप्लायन्स, सिक्युरिटी, रिटेल, इन्शुरन्स, रियल इस्टेट, फायर सेफ्टी, बीपीओ, केपीओ, कॅश मॅनेजमेंट, आदि विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

या विभागामार्फत मागील वर्षापर्यंत साधारणत: 200 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत होते. परंतु, जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सन 2022-23 पासून 600 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. सदर मेळाव्यांचे अधिक प्रभावीरीत्या आयोजन करण्याकरीता प्रती रोजगार मेळावे आयोजनाची तरतूद रु. 40 हजार पासून रु. 5 लाख करण्यात आली आहे.

सन 2022-23 अखेर आयुक्तालयामार्फत विविध योजना व 557 रोजगार मेळाव्याद्वारे सुमारे 2 लाख 83 हजार उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे. दोन्ही दिवशी केलेले सामंजस्य करार हे मुख्यतः मुंबई व मुंबई नजिकच्या जिल्ह्यातील असून राज्यातील उर्वरित विभागातील उमेदवारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उदा. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागात अश्याच पध्दतीने इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज इ. समवेत सामंजस्य करारनामा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणेमार्फत  गेल्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष स्थळी व ऑनलाईन पद्धतीने 16 मेळावे घेण्यात आले. यामध्ये 161 उद्योजकांनी उपस्थिती दर्शवली. यातून एक हजार 831 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षात 3 रोजगार मेळावे घेण्यात आले असून 29 उद्योजकांनी त्यात उपस्थिती दर्शवली. यातून 157 उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

या अनुषंगाने “कौशल्य केंद्र आपल्या दारी” या संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार इ. समवेत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.09 जून, 2023 रोजी, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे येथे “इंडस्ट्री मीट” चे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मा.मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बाल विकास, पर्यटन, मा.प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच, इंडस्ट्रीजना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता पुणे विभागातील सर्व नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांचेकडील रिक्तपदे उपलब्ध करून द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा. दूरध्वनी 0217-2950956

(संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर)

- Advertisement -