Home ताज्या बातम्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकासाचा आराखडा तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकासाचा आराखडा तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकासाचा आराखडा तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. ११: तळेगाव दाभाडे शहरातील पदाधिकारी- अधिकारी यांनी शहराच्या विकासाचा एकात्म विचार करून आराखडा तयार करावा. गरजेनुसार कोणती कामे अगोदर करावयाची आहेत त्याचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

प्रतीकनगर येथे तळेगाव दाभाडे शहरातील १२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या  भूमिपूजन  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मुख्याधिकारी एन.के. पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  निधीचे वाटप केले जात आहे. यावर्षी पुणे जिल्ह्याला १३० कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकास कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून विकासकामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी आणि ती वेळेत पूर्ण करावीत.

विकास कामांसाठी निधीची कमतरता  भासू दिली जाणार नाही.  विकासकामे  अपूर्ण ठेवू नका. कामे रेंगाळल्याने खर्च वाढतो. त्यामुळे ती वेळेतच पूर्ण करावीत, असे सांगून या  परिसरातील सोमेश्वर मंदिराला  ‘ क ‘ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

           श्री. बारणे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीचा  खूप मोठा वाटा आहे. तळेगाव दाभाडे शहर पुणे – मुंबई रस्त्यावर असल्याने या परीसरात स्थायिक होण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे. या परीसरात केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. मावळ तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११४ गावांमध्ये चांगले काम झाले असून त्यामध्ये ५० टक्के निधी केंद्र सरकारचा आहे. दीनदयाळ ग्राम ज्योती निधीच्या माध्यमातूनही  खेडोपाड्यात वीज पुरवली जात आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अनेक योजनांचा लाभ लाभार्थींना दिला जात आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे येथे सुरू असलेल्या आणि आज भूमिपूजन केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहरातील नाना भालेराव कॉलनी ते म्हाडा कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे, प्लॉट नं. १ जय भवानी सुपर मार्केट ते श्री अपार्टमेंट प्लॉट नं. १७ श्री अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे, प्रतिकनगर ते श्री. दाभाडे यांचे शेत ते मुख्य नाल्यापर्यंत ९०० मी.मी. व्यासाची आर.सी.सी. पाईप गटर करणे, सिंडीकेट बँकेमागील व समोरील रस्ता तसेच नाना भालेराव कॉलनी मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे व  प्लॉट नं. २९५, कृष्णा निवास से मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध विकासकामांचे  भूमिपूजन करण्यात आले.

०००