Home ताज्या बातम्या राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

0
राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.

संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नाविन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्टअप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.

माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री. बिर्ला यांच्याकडून कौतुक

देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

000

काशीबाई थोरात/विसंअ/