Home ताज्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे विद्यापीठ परिसरात भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे विद्यापीठ परिसरात भूमिपूजन

0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे विद्यापीठ परिसरात भूमिपूजन

नागपूर 18 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग  मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंजावर येथील श्रीमंत प्रिंस शिवाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या पुतळ्याचे भूमिपूजन संपन्न झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मार्फत हा पुतळा उभारला जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा असेल असा दावा करण्यात आला आहे. आज या भूमिपूजन समारंभाला स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार सर्वश्री अनिल देशमुख,  मोहन मते, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, बबनराव तायवाडे यांच्यासह विद्यापीठाचे तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सकाळी 10.45 वाजता मुख्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  पुतळा उभारणीचे काम लोकसहभागातून केले जाणार आहे. नागपूर विद्यापीठाशी संबंधित माजी विद्यार्थ्यांनी  समाजातील दानशून व्यक्तींनी लोकसहभागाच्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन स्मारक समितीने केले आहे.

असा असेल पुतळा

छत्रपती शिवरायांचा विद्यापीठ पसिरात उभा राहणारा पुतळा भव्य असेल अशी माहिती यावेळी स्मारक समितीने दिली आहे. पुतळ्याच्या चुबतऱ्यांची लांबी 20 फूट, रूंदी 15 फूट, उंची  9 फूट असेल तर या चबुतऱ्यांवर उभा राहणारा सिंहासनारूढ पुतळा 32 फूट उंचीचा असेल त्यावरील छत्र 7 फूट उंचीचे असेल. संपूण ब्राँझ धातूमध्ये बनविला जाणारा हा पुतळा 10 हजार किलोग्रॅम वजनाचा असेल. प्रसिद्ध मूर्तिकार सोनल कोहाड हा पुतळा साकारणार आहेत.

ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिरात आपल्या सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणी भूमिपूजन समारंभ आज नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाल्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे मुख्य कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिल देशमुख, विधानपरिषदेचे आमदार अभिजित वंजारी, आमदार मोहन मते, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, तांजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, मंगेश डुके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ज्ञानाच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा होत असल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्‍या जीवनावरील साहित्य येथे उपलब्ध होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे. मला आनंद आहे की, या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाचे चरित्र उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रसंताची ग्रामगीता, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ डिजिटल करण्यात येईल. त्याचा प्रभावीपणे वापर पुढील पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.

राष्ट्रसंतांच्या नावाप्रमाणेच विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रेणादायी ठरेल. ज्ञानाने परिपूर्ण असणारी पिढी निर्माण करायची असल्यास शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवणे गरजेचे आहे. लोकसहभागातून पुतळा उभारण्यात येणार आहे. लोकसहभाग हा चळवळीचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती व संस्थेने यामध्ये पुढाकार घ्यावा व स्मारक समितीच्या या कार्याला मदत करावी असे ते यावेळी म्हणाले. यावेळी श्रीमंती प्रिंस शिवाजी राजे भोसले व डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुर्तिकार सोनल कोहाड, वृषभ बंसल आणि गौरव डुबेवार यांचा सत्कार नितीन गडकरी यांचा हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश डुके यांनी केले. तर आभार रेखा घिया-दंडिगे यांनी मानले.