Home बातम्या पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

पवईत १५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज, नागरीवस्तीतील पहिलाच उपक्रम

0

डोंबिवली : राष्ट्रध्वजाविषयी जनजागृती करण्यासाठी गुरुवारी स्वातंत्र्यदिनी मुंबईतील पवई येथे १५० फूट उंचीवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. ६० बाय ४० फुटांचा हा राष्ट्रध्वज दोन इमारतींच्या मध्यभागी फडकणार आहे. नागरीवस्तीत अशाप्रकारे प्रथमच घडणार असल्याचा दावा आयोजक राजेश बक्षी यांनी केला आहे.

बक्षी हे पूर्वी अंबरनाथमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अंबरनाथ येथेच झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएससी केली. २००६ मध्ये ते पवई येथे राहायला गेले. बदलापूर येथे त्यांची औषधनिर्मिती कंपनी आहे. २०१५ मध्ये ते तुर्कस्तानमध्ये इस्तंबूलला गेले होते. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी राष्टÑध्वज फडकत असल्याचे पाहिले. तेव्हा आपला राष्टÑध्वजही भारतात सर्व ठिकाणी असावा, असे मनात आले. त्यानंतर त्यांनी राष्टÑध्वजाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांनी बी. के. फ्लॅग फाउंडेशनची स्थापना केली. बक्षी यांचे वडील भारतीय सैन्यात असल्याने राष्ट्रप्रेम त्यांच्या अंगी भिनले होते. त्यामुळे राष्ट्रासाठी काहीतरी करावे असे सतत त्यांच्या मनात येत होते. त्यातूनच त्यांनी जनजागृतीचे काम हाती घेतले.
सर्वप्रथम त्यांनी अंबरनाथ येथे हुतात्मा चौकात १०० फूट उंचीवर ध्वज फडकवला. त्यानंतर राजभवन येथे १५० फुटांवर, मुंबई विद्यापीठात १०० फूट उंचीवर राष्ट्रध्वज लावला आहे. ठाण्यात माजीवाडा, सीएसटीला हजहाउस येथेही राष्ट्रध्वज फडकावला आहे. हजहाउस ही इमारत २० मजली असून ६० फूट उंचीवर ध्वज लावणारी ही देशातील सर्वात उंच इमारत ठरली आहे.
राष्ट्रध्वज फाटल्यास तो लगेच बदलावा, १०० फुटांच्या वर राष्ट्रध्वज संपूर्ण वर्षभर ठेवू शकतो. राष्ट्रध्वज कधी काढावा, फाटलेला राष्ट्रध्वजांचे काय करावे याबाबत बक्षी जनजागृती करीत असतात. अनेक जण फोन करून त्यांचे मार्गदर्शन घेतात. अनेक संस्था, शाळा आणि महाविद्यालयातून ते मार्गदर्शन करतात.

गेटवेलाही फडकणार

सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार सोसायटी, घर, कार्यालय येथेही राष्ट्रध्वज लावू शकतो, असे बक्षी यांनी सांगितले. प्रत्येक गल्लीबोळात राष्ट्रध्वज फडकावा आणि प्रत्येक भारतीयांनी त्याला सलाम करावा, हाच बक्षी यांचा ध्यास आहे. लहान मुलांनाही राष्ट्रध्वजाविषयी माहिती असावी असे ते म्हणाले. लवकरच गेट वे आॅफ इंडिया येथेही राष्ट्रध्वज फडकवणार असल्याचे ते म्हणाले.