Home ताज्या बातम्या वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

0
वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवेचे सक्षमीकरण

 

            स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली होती. सन 2014 पासून 2023 पर्यंत 9 वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी शेकडो नवीन डॉक्टर निर्माण होऊन राज्यभर आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य ही सुराज्याच्या कल्पनेची एक महत्त्वाची बाब आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची असली, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून केवळ ॲलोपॅथी (Allopathy) तथा आधुनिक विज्ञान (modern science) या चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात.

वैद्यकीय शिक्षण, आयुष (AYUSH) (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध व होमिओपॅथी चिकित्सापद्धत) आणि अन्न व औषध प्रशासन या उपविभागाकडून राज्यातील जनतेस प्राथमिक आरोग्यासह औषधोपचार, विशेषोपचार व अतिविशेषोपचार सेवा देण्यात येते.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिनस्त वैद्यकीय सेवा व व्यवसाय या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करणे, मानवी जीवनाच्या प्रक्रियेमध्ये मानवाच्या शारीरिक, मानसिक, जन्मत: निर्माण होणारे आजार, अपघात, हवामानातील होणाऱ्या बदलामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य रोग इ. निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करुन मानवी जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संशोधन, उपाययोजना, वैद्यकीय शिक्षण, औषध निर्मिती व अनुषंगिक कायदे, या प्रयोजनार्थ आवश्यक वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ निर्माण करणे तसेच राज्यात वैद्यक शास्त्रात समतोल विकास साधणे व वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे इ. संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.

नऊ जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

प्रत्येक नागरिकांस उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. नऊ जिल्ह्यात (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून ती लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1432 पदे निर्माण

भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली. त्यामुळे तेवढे डॉक्टर जास्तीचे उपलब्ध होतील.

शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची कार्यवाही

राज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियायी विकास बँक (ADB) संस्थेकडून सुमारे 4 हजार कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) या संस्थेकडून  सुमारे 5500 कोटीचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे.

वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता

देश पातळीवर नर्सेसचे प्रमाण वाढावे याकरिता वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.  त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएसस्सी (Bsc) नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

जळगाव येथे मेडीकल हब

जळगाव येथे “मेडीकल हब” निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे.  तर  राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगांव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.

विविध अभियाने, मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, ‍स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. सदर अभियाने,मिशनमार्फत आरोग्य सेवा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.

परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतची  प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सदर भरती टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु

रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. 105.78 कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरीता 1086 पद निर्मीतीस मान्यता

याचबरोबर सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 रुग्ण खाटांच्या रुग्णालयाकरीता आवश्यक एकूण 1086 पद निर्मीतीसही मान्यता देण्यात आली असून त्यापोटी 109.19 कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यापूर्वीच सुरु झाले आहे.

प्रत्येक नागरिकाला आरोग्यासाठी प्राधान्य देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एकात्मिक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर दिला आहे. आजारांवर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच बालके आणि स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठीही  विशेष प्रयत्न केले आहेत.

ग्रामीण आणि दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहभागाला सहाय्यभूत ठरणारे धोरण अंमलात आणले आहे. दर्जेदार आरोग्य यंत्रणा विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

– गिरीष महाजन

मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य

 

(शब्दांकन : राजू धोत्रे, विसंअ)