Home शहरे कोल्हापूर कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

0

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेसह अन्य शहरांमधून यंत्रणा दोन्ही जिल्ह्यांच्या मदतीसाठी धावली आहे. पंचगंगेची पातळी धोक्याच्या इशारा पातळीवरून खाली आली आहे.

मुंबई महापालिकेसह काही कंपन्यांनी चिखलपाणी काढण्यासाठीची यंत्रे पाठवून दिली आहेत. बुधवारी दुपारी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जिल्हा परिषदेत पूरस्थिती आणि नंतरचे पुनर्वसन याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सलग आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून असून त्यांनी इतर जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कामाला लावली आहे. दिवसभरामध्ये पशुसंवर्धन विभागाने २५0 हून अधिक छोटी, मोठी जनावरे शास्त्रीयदृष्ट्या जमिनीमध्ये पुरली.

सांगलीचा महापूर गतीने ओसरत असून, बुधवारी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर म्हणजेच इशारा पातळीखाली आली होती. जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी यात आणखी पाच फुटाने घट होण्याची शक्यता असल्याने, आज, स्वातंत्र्यदिनी सांगली पूरमुक्तहोणार आहे.

कोयना धरणातून ३४ हजार ६५७ आणि वारणा धरणातून ३ हजार ९८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असून नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता नाही. महापूर ओसरत असल्याने पूरग्रस्त घरी परतत आहेत.

दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा विचार

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये अतिरिक्त होणारे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याबाबत विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून याबाबत संशोधन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.