Home ताज्या बातम्या विधानसभा लक्षवेधी

विधानसभा लक्षवेधी

0
विधानसभा लक्षवेधी

पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 04 : पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची तपासणी मोहीम राबविणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्या माधुरी मिसाळ यांनी पुणे महापालिकेच्या शाळांच्या समस्यांबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या एकूण 272 प्राथमिक शाळा आहेत. यापैकी मराठी माध्यमाच्या 185, उर्दू माध्यमाच्या 33, इंग्रजी माध्यमाच्या 52 व कन्नड माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये मिळून एकूण शिक्षकांची मंजूर पदे 2,425 असून त्यामधील 352 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात येणार असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येतील. ज्या शाळांमध्ये मुला-मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह नाहीत. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय केळकर यांनी सहभाग घेतला.

००००

शैलजा पाटील/विसंअ

पर्यावरण नियमांचे उल्लंघन असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल कंपनीवर कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 04 : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एम‌.आय.डी.सी. परिसरातील धारिवाल कंपनीने केलेल्या प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी केली जाईल. या कंपनीकडून पर्यावरण नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई होईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल पॉवर प्लांटच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, एम‌.आय.डी.सी.चे सहसचिवांच्यामार्फत 90 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल. यात ही कंपनी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

०००