Home ताज्या बातम्या जालना जिल्ह्यात शेती पद्धतीमध्ये रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

जालना जिल्ह्यात शेती पद्धतीमध्ये रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

0
जालना जिल्ह्यात शेती पद्धतीमध्ये रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

जालना, दि. 4 (जिमाका) – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आज घनसावंगी  तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे रेशीम  शेतीची पाहणी केली. कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकरी वळले आहेत. रेशीम शेती जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये निश्चितपणे क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन श्री. अर्दड यांनी यावेळी केले. जालना जिल्हयास रेशीम कपडा निर्मिती करण्यासही चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.

निपाणी  पिंपळगाव येथील युवा शेतकरी सोमेश्वर डिगांबर वैद्य  आणि नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम शेतीची विभागीय आयुक्तांनी पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. यावेळी रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी रेशीम उद्योग योजना व फायदे याविषयी माहिती दिली.

सोमेश्वर वैद्य यांनी जून 2022 मध्ये 2.00 एकर क्षेत्रात तुती लागवड केली आहे. आक्टोबर -2022 पासुन त्यांनी  रेशीम अळयांचे संगोपन करून कोष ‍ निर्मिती सुरू केली. आक्टोबर-2022 ते जुलै-2023 या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये सोमेश्वर यांनी रेशीम किटक संगोपनाच्या एकुण 8 बॅच घेतल्या व कोष विक्री पासुन 6,56,358/- इतके उत्पन्न  मिळविले. तसेच मनरेगाचे माध्यमातुन त्यांना अकुशलचे रू.2,14,000/- अनुदान अदा करण्यात आले. एकंदरीत सोमेश्वर वैद्य यांनी नऊ महिन्यांच्या कालावधी मध्ये रेशीम कोष व अनुदान मिळुन रू.8,70,358/-  चे उत्पन्न मिळविले आहे. म्हणजे त्यांना प्रति महा रू.96,706/- उत्पन्न मिळाले आहे.

यावेळी तुती रेशीम कोष विक्रीपासुन चांगले उत्पादन घेतल्याबद्दल सोमेश्वर वैद्य यांचा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांच्या हस्ते ‘ऑरेंज कॅप घालुन सन्मान करण्यात आला. तर त्यांच्या पत्नी सविता सोमेश्वर वैद्य यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पाचांळ यांच्या हस्ते  ऑरेंज कॅप घालुन सन्मान करण्यात आला.

श्री. अर्दड यांनी रेशीम उत्पादक शेतकरी नामदेव भीमराव माने यांच्या रेशीम किटक संगोपन केंद्राचीही पाहणी करून माहिती घेतली. नामदेव माने यांनी सुरूवातीस 1.00 एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली होती; परंतु रेशीम शेतीमधील भरघोस व शाश्वत उत्पन्न पाहुन त्यांनी आता 4.00 एकर क्षेत्रात तुती लागवडीचे क्षेत्र वाढविले. त्यांना प्रतिमहा रेशीम कोष विक्रीपासुन रू.60,000-90,000/- उत्पन्न माने मिळाते.

विभागीय आयुक्त म्हणाले की, कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया प्रमाणात शेतकरी वळले आहेत. रेशीम शेतीत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातच रोजगार मिळण्याबरोबरच चांगले उत्पादनही मिळत आहे, हे शेतकरी सोमेश्वर वैद्य यांच्या रेशीम शेतीमधील उत्पादन पाहता दिसून येते. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन तुती लागवड, कोष उत्पादन, किटक संगोपन गृह उभारणी इत्यादीकरीता  प्रति एकर रूपये 3,58,515/- अनुदानही देण्यात येते, त्यामुळे रेशीम शेती जालना जिल्हयातील शेती पध्दतीमध्ये क्रांती घडवुन आणेल.

‍ जिल्हाधिकारी  म्हणाले की,  रेशीम अंडीपुज निर्मितीपासून ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रीया उपलब्ध असणारा जालना हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे, जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत राज्यातील सर्व जिल्हयांतुन शेतकरी रेशीम कोष विक्री करता येत असतात, त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगास सुरूवात करावी व आर्थिक समृध्दी प्राप्त करून घ्यावी, यासाठी प्रशासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना सहकार्य करेल,

पाहणीदरम्यान निपाणी पिंपळगावचे सरपंच प्रतिभा प्रदिप  बिरनावळे, रवना गावचे सरपंच संभाजी देशमुख, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय कृषि अधिकारी सखाराम पवळ, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक ज्ञानेश्वर सोनवणे, वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक रेशीम एस.आर.जगताप, कंत्राटी तांत्रिक अधिकारी मनरेगा अनिरूध्द धांडे आदी उपस्थित होते.