Home ताज्या बातम्या लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनासाठी सदैव तत्पर राहील – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनासाठी सदैव तत्पर राहील – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

0
लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनासाठी सदैव तत्पर राहील – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

तिर्थपुरी येथे महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप

जालना, दि. 4 (जिमाका) :-  महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांसह नागरिकांची प्रलंबित  प्रकरणे गतीने निकाली काढली जात असून जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांच्या हितासाठी औरंगाबाद विभागातील लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनाकरीता मी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी दिली.

महसूल सप्ताहनिमित्त घनसावंगी तालुक्यातील तिर्थपूरी येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत विविध लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नगराध्यक्षा अलका शिंदे, उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, योगिता खटावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त श्री. आर्दड म्हणाले की, जालना जिल्ह्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित  केलेल्या आहेत. या योजनांच्या लाभार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्र देण्याचे कार्य “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून होत आहे. शेतकरी, नागरिकांची प्रलंबित कामे या उपक्रमाच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावली जात आहेत. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या महसूल सप्ताहात महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणून त्यांना गौरविण्यात येते. इतर कर्मचाऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने अशा कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येते. सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावीत, यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  जबाबदारीने व दक्षतेने कामे करावीत.

जिल्हाधिकारी श्री. पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विविध प्रकरणे तातडीने निकाली काढली जात आहेत. विद्यार्थ्यांसह लाभार्थ्यांना शासनाचे दाखले व विविध योजनांचे लाभ देणे हाच महसूल सप्ताहाचा उद्देश आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमातंर्गत जास्तीतजास्त लाभार्थ्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतीशील प्रशासनाच्या वाटचालीसाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.  तर महसूल सप्ताहात फेरफार अदालतीमध्ये निकाली काढलेल्या मौजे खा.हिवरा येथील गट क्र.53 मधील प्रकरणात तात्काळ निकालाची प्रत वितरीत करण्यात आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  वारसांना धनादेशाची वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतील राष्ट्रीय अर्थसहाय्य मंजूर लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. देवनगर व क्रांतीनगर येथील स्मशानभूमी आदेश वाटप, पुरवठा विभागाअंतर्गत पात्र 5 लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, सेतू विभागअंतर्गत विविध प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या 5 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, नवीन मतदार कार्ड वाटप, पंचायत समितीकडून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात किल्लीचे वाटप, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 2 लाभार्थ्यांना दोन लक्ष रुपयांचे धनादेश वाटप, कृषि विभागाअंतर्गत राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 4 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर व नांगराचे वाटप, रमाई आवास योजनेअंतर्गत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाभाचे धनादेशाद्वारे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी, ग्रामस्थ, लाभार्थी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.