मुंबई, दि. ५ : भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
एचएसएनसी विद्यापीठ, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे किशीनचंद्र चेल्लाराम महाविद्यालयातील (के. सी. महाविद्यालय) सभागृहात आज सकाळी ‘जी २० युवा संवाद- भारत @२०४७’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एच. एस. एन. सी. विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. निरंजन हिरानंदानी, विश्वस्त माया साहनी, कुलगुरू डॉ. हेमलता बागला, प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, एच. एस. एन. सी. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान बलानी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कोलते आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील. येत्या २५ वर्षांत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी स्टॅण्डअप, स्टार्टअपसारखे उपक्रम सुरू करीत उद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातून रोजगार निर्मितीबरोबरच भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. विकसित राष्ट्रांनी संशोधन, पेटंट आणि स्वामित्व धनावर (रॉयल्टी) भर दिला आहे. तरुणांनीही संशोधन कार्यावर भर दिला पाहिजे. विकसित राष्ट्रांच्या जी- २० या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील मुंबईसह पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरातही कार्यक्रम झाल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
डॉ. हिरानंदानी यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजना हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंसेवकांचे संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामे केली जातात. अशाच लहान- लहान कार्यक्रमातून परिवर्तन घडून येते. देशात पायाभूत सोयीसुविधांच्या विकास होत आहे. तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगारक्षम मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी पूरक आहे. त्यामुळे आगामी काळात देशात बदल घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. बागला यांनी विद्यापीठ आणि जी २० परिषदेच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.