औरंगाबाद, दि.6 (विमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. देशातील या रेल्वे रेल्वे स्थानकामध्ये औरंगाबाद रेल्वे स्थानकाचाही समावेश असून 359 कोटी रूपये खर्चून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली.
औरंगाबाद रेल्वे रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलील, आ. प्रशांत बंब, जेष्ठ नेत्या चित्रा वाघ, संजय केनेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, रेल्वेच्या नांदेड विभागाचे राजेंद्रकुमार मिना उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले, देशातील नागरिकांना आरामदायी सुविधा देण्यासाठी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून सततच्या वाढत्या गरजा लक्षात घेत हा पुनर्विकास करण्यात येणार आहे. राज्यातील 44 रेल्वे स्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पर्यावरण पूरक तसेच दर्जेदार सुविधा देण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे.
आपल्या शहरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील 508 रेल्वे स्थानकात आपल्या स्थानकाचा समावेश आहे. या माध्यमातून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत भर पडणार आहे. रेल्वेसेवेत आधुनिकता आणण्यासोबतच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सुविधा देण्याचा शासनाचा सर्वेतोपरी प्रयत्न आहे. रेल्वे सेवेच्या विस्ताराचाही प्रयत्न असून येत्या काळात विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारतसारख्या हाय स्पीड सेवा सुरू करण्याबाबत आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहनिर्माणमंत्री श्री. सावे म्हणाले, देशातील नागरिकांसाठी रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. पुर्वीच्या रेल्वे सुविधा आता कमी पडत असल्याने नव्याने रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील 44 रेल्वे स्थानकांबरोबर आपल्या शहरातील रेल्वे स्थानकाचा विकास होतोय, ही आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आधुनिक सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. राज्य शासन विकासकामासाठी खंबीरपणे बरोबर असल्याचे ते म्हणाले.
यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद रेल्वे सेवेबाबत विचार व्यक्त केले.
रेल्वेच्या नांदेड विभागाचे राजेंद्रकुमार मिना यांनी प्रास्ताविक केले. देशभरात आज एकाच वेळी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी होत आहे. जनतेला आपल्याला देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती असावी म्हणून या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
आज एकाच वेळी देशभरात 508 ठिकाणी कार्य्रकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
औरंगाबाद रेल्वे स्थानक पुनर्विकासाबाबत…
- औरंगाबाद हे राज्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक असून 359 कोटी रुपये खर्चून सध्याच्या आणि भविष्यातील प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानक पुनर्विकासासाठी निवडले गेले आहे.
- रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
- रेल्वे प्रवाशांना सेवा देण्यासाठी स्थानक कॉम्प्लेक्सला इतर पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांसह एकत्रित करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.
- स्थानक पुनर्विकासासह एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये प्रवाशांच्या अखंड हस्तांतरणासाठी स्थानक परिसरातील वाहतुकीच्या अनेक पद्धती एकत्रित केल्या जाणार आहेत.
- व्यवसायाच्या संधींच्या निर्मितीसह शहराच्या रस्त्यांच्या नेटवर्कशी एकत्रित जोडले जाणार आहे.
- स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी दक्षिण बाजूची एंट्री (प्रवेश) देखील देण्यात येणार आहे.
- रेल्वे प्रवाशांची उत्तम कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता, प्रवाशांसाठी सोयीस्कर पिकअप आणि ड्रॉप ऑफ क्षेत्रे, पुरेशी पार्किंग सुविधा या इतर सुविधा आहेत.
- औरंगाबाद स्थानकाच्या पुनर्विकासामुळे जागतिक दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह वर्धित अनुभव मिळेल ज्यामुळे भविष्यात वाढणा-या प्रवाशांच्या गरजा पूर्ण होणार आहेत.
प्रस्तावित सुविधा
- सध्याच्या 5,675 चौ.मी.च्या तुलनेत प्रस्तावित स्थानक इमारत क्षेत्राचे 27,073 चौ.मी. उत्तर स्थानक इमारत: 22,180 स्वेअर मीटर आणि दक्षिण स्थानक इमारत 4,893 स्वेअर मीटर टर्मिनल बिल्डिंग आणि सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा 72 मीटर डबल लेव्हल एअर कॉन्कोर्स
- रूफ प्लाझा (72×66 मीटर) आणि छताचे आवरण क्षेत्र: 28,800 चौ.मी.
- निर्गमन आणि आगमन प्रवाशांचे पृथक्करण
- सर्व प्लॅटफॉर्म मध्ये सुधारणा
- भविष्यातील विकासासाठी मल्टी लेव्हल कार पार्किंगसाठी तरतूद
- वेटिंग कॉन्कोर्स क्षेत्र: 4,752 चौ.मी
- फुट ओवर ब्रिज 04 क्रमांक (आगमनासाठी 2 आणि निर्गमन प्रवाशांसाठी 2)
- लिफ्ट: 13, एस्केलेटर: 12
- बहुभाषिक तिकीट पोर्टल
- रिटेल कोन्कोर्स: 314.चौ.मी
- छतावर सौर पॅनेलसह पर्यावरण पूरक बिल्डींग प्रमाणपत्र
- दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा
- पावसाचे पाणी साठवण, पाण्याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापन
- आपत्कालीन पॉवर बँकअपसह अग्निशमन व्यवस्था पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंट
- वाय-फायची सुविधा
- इतर सुविधा जसे की लॅपटॉप,मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, फार्मसी आणि वैद्यकीय सुविधा, प्रीपेड कॅब सुविधा, फूड कोर्ट झोन, शॉपिंग एरिया
- केंद्रीकृत सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टम