पणजी,दि.७ (म.प.कें.): मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि प्रसारासाठी ग्रंथोत्सव, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन असे विविध उपक्रम गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी संयुक्तपणे १५ ऑक्टोबर पासून सुरू करावेत, असे निर्देश महाराष्ट्र मा. मुख्यमंत्री महोदयांचे तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी दिले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सक्षमीकरणासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबतही त्यांनी सूचना केली.
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमीकरणाबाबत आज गोवा मनोरंजन सोसायटीच्या परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोवा माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दिपक बांदेकर, गोमंतक मराठी अकादमी परवरी अध्यक्ष प्रदीप घाडी-आमोणकर, उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, सचिव भारत बागकर, सदस्य प्रभाकर ढगे, श्यामसुंदर कवठणकर, प्रकाश कळंगुटकर, महाराष्ट्र मंडळ गोवा अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्र सक्षमतेने पुन्हा सुरू करण्याबाबत प्रधान सचिव श्री. सिंह यांनी उपस्थित सर्वांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर श्री. सिंह म्हणाले की, मराठी भाषेचा विकास, संवर्धन आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासनातर्फे पणजीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र सक्षम करण्यासाठी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बैठक घेवून सूचना केल्या आहेत. या कार्यालयाचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा, त्यास तात्काळ मंजुरी दिली जाईल. त्यास आवश्यक तो निधी दिला जाईल.
ग्रंथोत्सव, चर्चासत्र, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन, लेखक आपल्या भेटीला असे विविध उपक्रम गोमंतक मराठी अकादमी, महाराष्ट्र मंडळ गोवा आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी संयुक्तपणे सुरू करावेत. 15 ऑक्टोबर पासून उपक्रम सुरू होतील, असे नियोजन करावे त्याचबरोबर महाराष्ट्र परिचय केंद्राकडील असणाऱ्या ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तकांचे जतन करण्यासाठी डिजीटलायजेशन करण्याबाबतचा प्रस्ताव देखील सादर करावा. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यामध्ये दूत म्हणून काम करणारे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र परिचय केंद्र नव्या जोमाने काम करेल, असा विश्वासही प्रधान सचिव श्री. सिंह यांनी बोलून दाखविला.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) प्रशांत सातपुते (अ.का.) यांनी स्वागत करुन प्रस्ताविक केले. कोल्हापूर विभागीय प्र.उपसंचालक (माहिती) सुनील सोनटक्के यांनी आभार मानले.
०००